IPL 2021: पॉइंट टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची स्थिती खराब, दिनेश कार्तिकने सांगितले संघ प्लेऑफसाठी कसा होईल पात्र
दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन (Photo Credit: Instagram)

आयपीएल (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील रस्ता कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) सोपा होणार नाही पण संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) खात्री आहे की त्याची टीम उर्वरित सात पैकी सहा सामने जिंकून आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरेल. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा पहिला टप्पा दोन वेळा माजी चॅम्पियन केकेआरसाठी (KKR) चांगला ठरला नाही आणि संघ सातपैकी फक्त दोन सामने जिंकू शकला. केकेआर संघ सध्या गुणतालिकेत तळापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम पुढील काही दिवसांत यूएईमध्ये सुरु होणार आहे. कार्तिकने केकेआरच्या वेबसाईटला सांगितले की, “आम्हाला सातपैकी सहा सामने (पात्रता मिळवण्यासाठी) जिंकायचे आहेत. ही एक सामान्य गोष्ट आहे. एक संघ म्हणून हेच आमचे ध्येय आहे. एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करू, परंतु पुढील सात पैकी सहा सामने जिंकण्याचा प्रयत्न करेल.”

इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील संघ 20 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध आयपीएल 2021 मध्ये आपली मोहीम पुन्हा सुरु करेल. यापूर्वी आयपीएल 2020 मध्ये केकेआरचा संघ खराब नेट रन रेटमुळे बाद फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला. कार्तिक म्हणाला की, “गेल्या वर्षी जेव्हा आम्ही यूएईमध्ये खेळलो होतो, तेव्हा आम्ही थोड्या फरकाने (प्लेऑफमध्ये पात्र ठरू) चुकलो. आम्ही पात्रता मिळवण्याच्या शेवटच्या संघापेक्षा जास्त सामने जिंकले, पण तरीही बाद फेरीत स्थान मिळवू शकलो नाही. सलग दोन वर्षे पॉइंट टेबलमध्ये आम्ही पाचव्या क्रमांकावर राहिलो. हे मला अजूनही दुखावते.” यूकेमध्ये समालोचक म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर केकेआरसोबत परतलेल्या कार्तिकने आग्रह धरला की संघ सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल आणि आक्रमक क्रिकेट खेळत राहील. “केकेआर अतिशय सकारात्मक आणि आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी पुढे जावे असे मला वाटते. मला अजूनही वाटते की सांघिक भावना चांगली आहे. आम्ही सकारात्मक आहोत आणि आमच्याकडे एक प्रशिक्षक आहे जो नेहमी आपल्यामध्ये सकारात्मकता आणतो,” तो म्हणाला.

आयपीएल 2021 मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्याने पुन्हा सुरु होईल. साखळी टप्प्यातील अंतिम सामना 8 ऑक्टोबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल.