IPL 2021 Auction: आयपीएल लिलावासाठी फ्रँचायझींकडे 85 कोटी शिल्लक; जाणून घ्या CSK, RCB, मुंबई इंडियन्सकडे किती आहे रक्कम!
IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2021 हंगामासाठी लिलावाचे काउंटडाउन सुरु झाले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या रिटेन व व्यापाराची मुदत निश्चित केली आहे. फ्रँचायझींनी आगामी काळात काही खेळाडूंना त्यांच्या संबंधित पर्समधील रक्कम वाढवण्यासाठी काही खेळाडूंची साथ सोडतील तर काही संघ मालकांना इतरांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आयपीएल (IPL) 2022 मध्ये दोन अधिक संघ जोडण्याची योजना बोर्डाने आखल्यामुळे बीसीसीआयने यंदा मोठा लिलाव न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, चेन्नई सुपर किंग्ससह (Chennai Super Kings) अनेक संघांना मिनी लिलावावर समाधान मानावे लागणार आहे. मात्र, या निर्णयामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ज्यांच्याकडे स्थायिक संघ आहेत अशा फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला आहे. टी-20 लीगच्या 13व्या सत्रातील फायनलमध्ये पोहोचलेले दोन्ही संघ यंदा बोली-युद्धात फारसा सामील होणे अपेक्षित नसले तरी, मालक काही बदल करू शकतात. (IPL 2021 Auction मध्ये एमएस धोनी होणार मालामाल, CSK कर्णधार 150 कोटींची कमाई करणारा ठरणार पहिला खेळाडू; विराट कोहली, रोहित शर्मा राहणार मागे)

20 जानेवारीपर्यंत फ्रँचायझी त्यांनी कायम ठेवलेल्या ठेवलेल्या संघाची यादी जाहीर करण्यास सांगितले आहेत. सर्व फ्रँचायझींकडे मिळून लिलावासाठी 85 कोटी रुपये शिल्लक आहेत तर तीन वेळा आयपीएल विजेता चेन्नई सर्वात कमी रक्कम शिल्लक आहेत ज्यामुळे, ते पर्समधील रक्कम वाढवण्यासाठी केदार जाधव आणि पियुष चावला यांची साथ सोडण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. आयपीएलचे विक्रमी पाच विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सकडे 1.95 कोटी रुपये आहेत. यानंतर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीकडे 6.4 कोटी रुपये बाकी आहेत. कोलकाता नाईट रायडर्सकडे 8.5 कोटी शिल्लक असून ते यंदा आंद्रे रसेल आणि सुनील नारायणाची साथ सोडू शकतात. शिवाय, मागील वर्षी पहिल्यांदा आयपीएल फायनल गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सकडे 9 कोटी रुपये असून त्यांच्या संघात अधिक फेरबदल होण्याची शक्यता कमीच आहे.

दुसरीकडे, किंग्स इलेव्हन पंजाबच्या पर्समध्ये सर्वाधिक 16.5 कोटी रुपये शिल्लक आहेत. पंजाबच्या पाठोपाठ राजस्थान रॉयल्सचा नंबर लागतो. रॉयल्सच्या खिशात 14.75 कोटी रुपये जमा आहेत. त्यानंतर, सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीकडे 10.1 कोटी रुपये असून डेविड वॉर्नर, केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार यांच्यासारख्या आंतराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतो.