India Tour of Australia 2020-21: आयपीएल (IPL) 2020 चा हंगाम संपुष्टात येताच भारतीय संघ (Indian Team) त्वरित ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मात्र, या दौऱ्यातील कोणत्याच मालिकेसाठी रोहित शर्माचा दुखापतीमुळे (Rohit Sharma Injury) समावेश करण्यात आला नव्हता. पण, त्याने नुकतंच दुखापतीतून पुनरागमन केलं आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 2 सामने खेळले असल्याने त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता वाढली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी आणि मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी रोहितला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने चाहत्यांची फार निराशा झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पुनरागमन केल्यामुळे चाहत्यांना हिटमॅनला पुन्हा भारताच्या ब्लु जर्सीमध्ये पाहण्याच्या आशा जागवल्या आहेत. (India Tour of Australia 2020-21: टीम इंडिया कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अंतिम दोन टेस्ट सामन्यांना मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण)
दरम्यान, अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी काही अहवाल सूचित करतात की 33 वर्षीय हिटमॅन भारतीय संघासह चार्टर्ड फ्लाइटमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. "या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. रोहित संघाबरोबर असणे योग्य ठरेल, जेणेकरुन फिजिओ नितीन पटेल आणि ट्रेनर निक वेबबरोबर त्याला त्याच्या ताकदीवर काम करता येईल," PTI ने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले. यापूर्वी, रोहितने आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मागील सामन्यात टॉस दरम्यान रोहित म्हणाला, “संपूर्ण टूर्नामेंटमध्ये नाणेफेकविषयी बरीच अटकळ बांधली जात आहे. टॉसवर अधिक लक्ष केंद्रित करण्याऐवजी आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे. मला तंदुरुस्त वाटत आहे."
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया 3 वनडे, 3 टी-20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल, तर टी-20 मालिका 4 डिसेंबरपासून खेळली जाईल. त्यानंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही खरोखर अवघड परिस्थिती असेल कारण केएल राहुलला व्हाइट बॉल संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले असून रोहितला पहिल्या संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे रोहितची उपकर्णधार म्हणून नियुक्ती होईल की नाही किंवा यष्टीरक्षक फलंदाजच उपकर्णधार बनून राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाला पोहचताच भारतीय संघ 14 दिवसांसाठी क्वारंटाइन होईल. यादरम्यान त्यांना सराव करण्याची देखील मुभा दिली जाऊ शकते.