IND vs WI 1st ODI: श्रेयस अय्यर-रिषभ पंत यांची झुंजार बॅटिंग, टीम इंडियाचे वेस्ट इंडिजसमोर 288 धावांचे लक्ष्य
श्रेयस अय्यर-रिषभ पंत (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम (MA Chidambaram) स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने नाणेफेक जिंकल्यावर पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 बाद 287 धावा केल्या आहेत आणि विंडीजसमोर 288 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाकडून रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी सर्वाधिक धावा केल्या. पंत 71 तर श्रेयसने 70 धावा केल्या. विंडीजविरुद्ध वनडे सामन्यातून डेब्यू करणारा शिवम दुबे (Shivam Dube) 9 धावाच करू शकला. दीपक चाहर (Deepak Chahar) 7 धावांवर नाबाद राहिला. दुसरीकडे, वेस्ट इंडिजकडून शेल्डन कोटरेल आणि अलझारी जोसेफ यांनी सर्वाधिक 2 गडी बाद केले. पोलार्ड आणि कीमो पॉल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताची आघाडीची फळी स्वस्तात बाद झाल्यावर पंत आणि श्रेयसने सावध खेळी करत डाव सावरला आणि मोठा स्कोर करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. (IND vs WI 1st ODI: चेन्नई मॅचमध्ये '12 व्या खेळाडूमुळे' थांबला खेळ, यूजर्सने आनंद लुटत केले मजेदार ट्विट्स)

टॉस गमावून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या भारताला सहाव्या ओव्हरमध्ये पहिला धक्का दिला. केएल राहुल (KL Rahul) ला 6 धावांवर कोटरेलने बाद करत विंडीजला पहिला झटका दिला. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये कोटरेलने भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला 4 धावांवर बोल्ड केले. कोहली बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयसने रोहित शर्मा (Rohit Sharma) यासह डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण 80 धावांवर भारताने तिसरी विकेट गमावली. अलझारी जोसेफने रोहितला 56 चेंडूत 36 धावांवर कॅच आऊट केले. यानंतर पंतसह अय्यरने डाव सावरला. यादरम्यान, श्रेयसने 70 चेंडूत पाचवे अर्धशतक पूर्ण केले, तर पंतने 49 चेंडूत तुफानी फलंदाजी करत पहिले वनडे अर्धशतक ठोकले. पंत आणि अय्यरमध्ये शतकी भागीदारी झाली. श्रेयस आणि पंतने चौथ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. या दोंघाची भागीदारी विंडीजसाठी डोकेदुखी ठरत असताना अलझारीने अय्यरला बाद करत महत्वाचे यश मिळवून दिले. त्यानंतर पोलार्डने पंतला झेलबाद करत दुसऱ्या सेट फलंदाजाला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. रवींद्र जडेजा 21 आणि केदार जाधव 40 धावांचे योगदान दिले.

चेन्नईमध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाकडून टी-20 मालिकेत प्रभावी खेळी करणाऱ्या शिवम दुबे याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारताकडून वनडे  क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 228 वा खेळाडू ठरला.