IND vs SA 3rd Test Day 1: Lunch पर्यंत टीम इंडियाने गमावले 3 विकेट; रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांची सावध खेळी
रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील रांची (Ranchi) मधील तिसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी भारताचे आघाडीचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. पहिल्या दिवसाच्या लंच वेळ पर्यंत भारताने 71 धावांवर 3 विकेट गमावले. लंचपर्यंत रोहित 38 आणि रहाणे 11 धावांवर खेळत होता.  या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने स्पष्ट असा पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या ओव्हरमध्ये आफ्रिकी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याला 10 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. मयंकने पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात शानदार दुहेरी शतक केले होते. त्यानंतर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात शतक केले होते. रबाडाने दिवसाच्या सुरुवातीला शानदार गोलंदाजी करत संघाला दोन यश मिळवून दिले. मयंकनंतर राबाडाने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला शून्यावर माघारी धाडले. पुजारा सुरुवातीपासून फलंदाजीत संघर्ष करताना दिसत होता. त्यानंतर रोहित शर्मा याने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, एनरिच नॉर्टजे याने विराटला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि संघाला तिसरे यश मिळवून दिले. कोहलीने 12 धावा केल्या. (IND vs SA 3rd Test Day 1: क्रिकेटपटू शाहबाझ नदीम याचा वयाच्या तिशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु, 15 वर्षांती तपश्चर्या आली फळाला)

आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये टॉस जिंकून भारताने पहिले फलंदाजी घेतली. आजच्या मॅचसाठी टीम इंडियामध्ये एकच बदल करण्यात आला आहे. इशांत शर्मा याला विश्रांती मिळाली आहे. त्याच्या जागी 30 वर्षीय शाहबाझ नदीम याला संधी देण्यात आली आहे. आफ्रिकाविरुद्ध नदीमची ही पहिली आंतरराष्ट्रीय मॅच आहे. यापूर्वी त्याने 15 वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. शिवाय, नदीम इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळतो.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यासह भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्विप देण्यास सज्ज आहे. याआधी भारतीय संघानं 2-0 ने आधीच मालिका आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळे, तिसरा सामना आफ्रिकेसाठी महत्त्वाचा आहे. यंदाच्या भारत दौऱ्यावर आफ्रिकेला क्लीन-स्वीप टाळण्यासाठी तिसऱ्या मॅचमध्ये सर्वोच्च प्रदर्शन करावे लागणार आहे.