IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी भारताला धक्का, धाकड अष्टपैलू COVID संक्रमित - रिपोर्ट
वॉशिंग्टन सुंदर (Photo Credit: Instagram)

IND vs SA 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात आजपासून केप टाउन येथे तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. तर 19 जानेवारीपासून दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. तथापि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार दुखापतीमुळे संघाबाहेर राहून पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि आगामी मालिकेतील त्याचा सहभाग आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. दक्षिण आफ्रिकेतील मालिकेसाठी सुंदरची वनडे भारतीय संघासाठी (Indian Team) निवड करण्यात आली आहे. मात्र आता 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सुंदरचे खेळणे कठीण दिसत आहे. 22 वर्षीय सुंदर भारतीय एकदिवसीय संघासाठी केप टाउनला रवाना होणार होता, मात्र आता तो दौऱ्यावर जाऊ शकणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. (IND vs SA: ऋतुराज गायकवाड ओपनिंगला येण्याची शक्यता, चेतन शर्माने रुतुराजला संघात का निवडले सांगितले कारण)

दुखापतीमुळे सुंदर जवळपास 10 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर असून त्याने मार्च 2021 मध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. तो अलीकडेच बरा झाला आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी तामिळनाडू संघाचा भाग होता ज्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली आणि यामुळे त्याला एकदिवसीय संघात परत बोलावण्यात आले. तथापि, कोविड संसर्गामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन तात्पुरते पुढे ढकलले जाऊ शकते. वैयक्तिक पातळीवर देखील क्रिकेटरसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. दरम्यान बीसीसीआय अद्याप त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली नाही परंतु एका पदाधिकाऱ्याने 22 वर्षीय खेळाडूची चाचणी सकारात्मक झाली आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेला जाणार नसल्याची पुष्टी केली आहे.

दुसरीकडे, दोन्ही संघातील वनडे मालिकेबद्दल बोलायचे तर 19 जानेवारी रोजी पार्लमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर भारत 21 जानेवारी रोजी पार्लमध्ये दुसरा सामना खेळेल आणि 23 जानेवारी रोजी केप टाउनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामन्यासह दौरा संपवतील.