IND vs PAK, T20 World Cup 2021: भारताविरुद्ध हाय-व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, बाबर आजमने या खेळाडूंवर लावला दाव
पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

पाकिस्तानने (Pakistan) रविवारी टी-20 विश्वचषक 2021 च्या सुपर 12 मधील भारताविरुद्ध (India) पहिल्या सामन्यापूर्वी 24 तासांपूर्वी आपल्या 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दोन्ही संघांमधील हा हाय-व्होल्टेज सामना दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. पाकिस्तानला आतापर्यंत एकाही वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला हरवता आलेले नाही, मग ते वनडे असो किंवा टी-20 फॉर्मेटमध्ये. भारताविरुद्ध सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या संघात त्या सर्व प्रमुख खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यांनी अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने (Babar Azam0 त्याच्या अंतिम 12 मध्ये माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक-फलंदाज सर्फराज अहमदपेक्षा अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकवर (Shoaib Malik) विश्वास दाखवला. त्याने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, रविवारी भारताविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी पाकिस्तानची ही सर्वोत्तम इलेव्हन आहे. (India Playing XI vs Pakistan: सराव सामन्यात टीम इंडिया पास, पण पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनवर अडकला पेच; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

उल्लेखनीय आहे की 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाचा पराभव करत सरफराज अहमद पाकिस्तान संघाला मोठा विजय मिळवून देणारा शेवटचा कर्णधार होता. पण आता टेबल आता उलटले आहेत असे दिसत आहे आणि तो उद्या रात्री भारताविरुद्ध मुख्य संघात सहभागी होणार नाही. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या निराशाजनक ट्रॅक रेकॉर्डवर बोलताना, वनडे आणि टी 20 फॉरमॅटमध्ये तब्ब्ल 12 सामने गमावल्यानंतर 27 वर्षीय कर्णधाराने म्हटले की, “गोष्टी सोप्या ठेवणे आणि मूलभूत गोष्टींवर टिकून राहणे महत्वाचे आहे. आपण भूतकाळाबद्दल जास्त विचार करू नये. आम्हाला स्पर्धा आणि सामने पुढे येण्याबद्दल खूप विश्वास आहे,” आजम म्हणाला. या शिवाय, आयसीसी वर्ल्ड टी-20 2021 टूर्नामेंट जिंकण्याचा प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाशी सामना करणार्‍या या पाकिस्तानी संघाच्या मुख्य शक्तींबद्दल आजमने मत व्यक्त केले आणि म्हटले, “आमची मुख्य ताकद आमची फलंदाजी आहे. आमचे फलंदाज गेल्या दोन महिन्यांपासून ज्याप्रकारे कामगिरी करत आहेत, मला विश्वास आहे की ते भारताविरुद्ध सामन्यातही कामगिरी करतील.”

भारताविरुद्ध सामन्यासाठी पाकिस्तानचा 12 सदस्यीय संघ : बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.