IND vs ENG Test Series 2021: आर अश्विनला हरभजन सिंह याचा भारी विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी, इंग्लंडविरुद्ध केली आहे शानदार कामगिरी
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Getty)

IND vs ENG Test Series 2021: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यशस्वी कामगिरी केलेला रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पुन्हा एकदा भारतीय संघात (Indian Team) अनुभवी ज्येष्ठ गोलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. अश्विन दौऱ्यावर फक्त ज्येष्ठ खेळाडूंपैकी एक नव्हता तर त्याने 12 विकेट घेत स्टीव्ह स्मिथला त्रास दिला आणि त्याने सिडनीमध्ये नाबाद 39 धावांच्या खेळीने तिसरा सामना अनिर्णीत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. अश्विन आता भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामने त्याच्या घरच्या मैदानावर, चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे ऑफ स्पिनरलाही विशेष कामगिरीची आणि माजी ज्येष्ठ गोलंदाज हरभजन सिंहच्या (Harbhajan Singh) पुढे जाण्याची सुवर्ण संधी आहे. (IND vs ENG Test Series 2021: भारत आणि इंग्लंड टेस्ट सिरीजमध्ये गोलंदाजांची 'कसोटी'; जेम्स अँडरसन, जसप्रीत बुमराह, आर अश्विन यांना रेकॉर्ड ब्रेक कामगिरीची संधी)

अश्विनने आतापर्यंत 74 कसोटी सामन्यांत एकूण 377 विकेट घेतल्या असून 254 विकेट भारतात घेतल्या आहेत. त्यामुळे, पहिल्या कसोटी सामन्यात 34 वर्षीय अश्विनने 12 किंवा अधिक विकेट घेतल्यास तो भज्जीच्या 265 विकेट्सना मागे टाकत घरच्या परिस्थितीत दुसरा सर्वात यशस्वी भारतीय फिरकीपटू बनू शकतो. फिरकी गोलंदाजाने भारतात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांना मिळाला आहे. कुंबळेने भारतात सर्वाधिक 350 विकेट घेतल्या आहेत. शिवाय, अश्विन देखील चेन्नई कसोटीपूर्वी आणखी एक वैयक्तिक महत्त्वाचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 50 कसोटी विकेट पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी 8 विकेटची गरज आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध बी.एस. चंद्रशेखर, कुंबळे आणि आणि बिशन सिंह बेदी यांनी हा मैलाचा दगड गाठला आहे.

इंग्लंडविरुद्ध पाहिल्या सामन्यात 12 विकेट घेणे आणि भज्जीला मागे टाकत घरच्या मैदानावर दुसरा यशस्वी गोलंदाज बनण्यासाठी अश्विनसाठी कठीण असेल मात्र इंग्लिश टीमविरुद्ध अश्विनची आजवरची कामगिरी पाहता त्याच्याकडे मैदान मारण्याची क्षमता नाकारली जाऊ शकत नाही. 2016-17 मालिकेत त्याने पाच कसोटी सामन्यात 28 तर 2018-19 इंग्लंड दौऱ्यावर तितक्याच सामन्यात 11 विकेट घेतल्या होत्या. अश्विनने इंग्लंडविरुद्ध एकूण 56 विकेट घेतल्या आहेत.