IND vs ENG 3rd Test: टीम इंडिया सावधान! तिसऱ्या कसोटीत इंग्लंड कर्णधार Joe Root ठरू शकतो पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक, कारणही आहे विशेष
जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीला फक्त एक दिवस शिल्लक आहे. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी अनिर्णित राहिली, तर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने  (Team India) ब्रिटिशांविरुद्ध रोमांचक सामना 151 धावांनी जिंकला. मालिकेची तिसरी कसोटी आता लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) मैदानावर होणार आहे. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतरही हा सामना भारतासाठी सोपा होणार नाही, कारण हेडिंग्ले हे इंग्लिश कर्णधार जो रूटचे (Joe Root) होम ग्राउंड आहे. या मालिकेच्या तीनही सामन्यात जो रूटच्या बॅटने भरपूर धावा लुटल्या आहेत आणि तो दोन्ही संघांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शिवाय, मालिकेत पिछाडीवर असलेल्या ब्रिटिश संघाला (England Team) बरोबरीत आणण्यासाठी रूट पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वासोबत बॅटने कमाल दाखवण्यासाठी उत्सुक असेल. अशास्थितीत भारतीय संघाला (Indian Team) सावधानी बाळगण्याची गरज आहे. (IND vs ENG 3rd Test: ‘आम्ही आमचा धडा शिकलो’! ‘विराट ब्रिगेड’ला घाबरला इंग्लंड कर्णधार जो रूट, आता नाही अडकणार टीम इंडियाच्या जाळ्यात)

इंग्लंड दौऱ्यावर आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट राहिली असली तरी जेव्हा त्यांच्यासमोर रूट येतो तेव्हा पारडे दुसऱ्या बाजूला झुकते. रूटच्या उत्कृष्ट फॉर्मचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की त्याने मालिकेच्या फक्त दोन सामन्यांमध्ये 400 च्या जवळपास धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन मजबूत शतके आणि एक अर्धशतकी धावसंख्येचा पल्ला गाठला आहे. नॉटिंगहॅममधील रूटचे शतक व पावसाच्या जोरावर भारताविरुद्ध सामना ड्रॉ करण्यात इंग्लिश टीम यशस्वी ठरली. दरम्यान ‘विराटसेने’ला या मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची असेल तर त्यांना रूटच्या बॅटवर नक्कीच लगाम घालावी लागेल. दुसरीकडे, लीड्स कसोटी सामन्यापूर्वी रूटने स्पष्ट केले की त्याचा संघ तिसऱ्या कसोटीत स्लेजिंग किंवा शाब्दिक बाचाबाची टळेल. दोन्ही संघांमधील लॉर्ड्स कसोटी तणावपूर्ण वातावरणात खेळली गेली. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना सतत स्लेजिंग करत होते.

याबाबत रूटने म्हटले आहे की, त्याच्या संघाने शेवटच्या सामन्यातून धडा घेतला आहे आणि कोणत्याही वादात अनावश्यकपणे सहभागी होणार नाही. तो म्हणाला की, “खेळादरम्यान, परिस्थिती थिएटरसारखी झाली होती. आम्हाला खात्री आहे की आम्ही ज्या पद्धतीने खेळू इच्छितो तसे खेळू आणि आम्ही शक्य तितके ते नियंत्रित करू. प्रामाणिकपणा नसलेल्या गोष्टींकडे आपण खूप विचलित किंवा आकर्षित होऊ नये असे आम्हाला वाटते.”