IND vs AUS 3rd Test: सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्मासाठी 'या' खेळाडूची होणार टीम इंडियातून एक्झिट, वाचा सविस्तर

आगामी क्रिकेट कसोटीमधील रोहितच्या फलंदाजी क्रमाविषयी अनेकजण विचारात असताना 'हिटमॅन' पुन्हा एकदा सलामी फलंदाजाच्या रूपात टीम इंडियामध्ये सामील होताना दिसत आहे आणि त्याच्यासाठी मयंक अग्रवालची एक्झिट होणे जवळपास निश्चितच दिसत आहे.

रोहती शर्मा, मयंक अग्रवाल (Photo Credits: BCCI-Twitter)

IND vs AUS 3rd Test: ‘रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी खेळणार का आणि खेळला तर तो कुठे फलंदाजी करेल?’ - असा प्रश्न सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये (Sydney Cricket Ground) होणाऱ्या महत्त्वपूर्ण टेस्ट मॅचपूर्वी प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. 7 जानेवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असल्याने तिसरा सामना जिंकणाऱ्या संघाला विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. रोहित 14 दिवसांच्या क्वारंटाइननंतर दुसर्‍या कसोटीनंतर सिडनी येथे भारतीय संघात (Indian Team) सामील झाला. पोटरीच्या दुखापतीमुळे रोहितला पहिल्या दोन टेस्ट सामन्यांना मुकावे लागले. आगामी क्रिकेट कसोटीमधील रोहितच्या फलंदाजी क्रमाविषयी अनेकजण विचारात असताना 'हिटमॅन' पुन्हा एकदा सलामी फलंदाजाच्या रूपात टीम इंडियामध्ये सामील होताना दिसत आहे आणि त्याच्यासाठी मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) एक्झिट होणे जवळपास निश्चितच दिसत आहे. रोहितला फॉर्मात नसलेल्या मयंकच्या जागी संघात स्थान दिले जाईल आणि मागील कसोटी सामन्यात पदार्पणानंतर प्रभावी दिसणार्‍या शुभमन गिलसह सलामीला मैदानात उतरेल. (IND vs AUS 3rd Test: सिडनी टेस्ट मॅचसाठी असा असेल टीम इंडियाचा Playing XI, पहा कोणाला मिळेल संघात स्थान)

कसोटी मालिकेत पहिले सलामी फलंदाज पृथ्वी शॉच्या अ‍ॅडिलेड येथील अपयशानंतर छुट्टी झाली आणि शुभमन गिलला संधी मिळाली. आता,ऑस्ट्रेलियामधील अपेक्षेच्या दबावामुळे अग्रवालला देखील बाहेर पडावे लागताना दिसत आहे. मागील 6 कसोटी सामन्यात अग्रवालने 7, 3, 17, 9, 0, 5 अशा धावा केल्या आहेत. रोहित शर्मा डाऊन अंडर आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून तिसऱ्या टेस्टच्या निवडीसाठी उपलब्ध असल्याने देखील अग्रवालच्या दबावात आणखी भर पडली. मयंकच्या उलट रोहितने मागील 6 सामन्यात 176, 127, 14, 212, 6 आणि 21 अशा धावा करत संघात स्थानासाठी दावेदारी दर्शवली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात मयंकला रिप्लेस करण्यासाठी रोहित पहिली पसंत आहे, परंतु त्याच्या विरोधात उभा असलेला एक घटक म्हणजे सरावाचा अभाव. आयपीएल 2020 फायनलनंतर रोहित मैदानावर उतरलेला नाही आणि आता रोहितकडे तयारीसाठी कमी वेळ शिल्लक राहिला आहे.

शिवाय, सिडनी टेस्टसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अन्य बदलही निश्चित मानले जात आहेत. उमेश यादवला दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले ज्यामुळे आता तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी आणि टी नटराजन यांच्यामधून संघाला निवड करण्याचा पर्याय आहे. नटराजनला संधी दिल्यास तो मर्यादित ओव्हरनंतर कसोटी फॉरमॅटमध्ये देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू करू शकतो.