
IND vs ENG 2nd Test 2025: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. लीड्स येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून एजबॅस्टनमध्ये खेळला जाईल. या पराभवानंतर काही क्रिकेट तज्ज्ञांनी आणि चाहत्यांनी संघाच्या युवा कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गिलच्या बाजूने उभं राहत ठामपणे पाठिंबा दर्शवला आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd Test 2025: यशस्वी जयस्वालला एकाच वेळी 4 फलंदाजांचा विक्रम मोडण्याची संधी, फक्त दोन षटकारांची गरज)
रवी शास्त्री यांचा गिलला ठाम पाठिंबा
विस्डेनला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले की, 'गिलला किमान तीन वर्षे वेळ द्या. या काळात काहीही झाले तरी नेतृत्वात बदल करू नका. त्याला अनुभव मिळू द्या. माझा विश्वास आहे की तो भारतासाठी खूप चांगले काम करेल.' शास्त्री पुढे म्हणाले की, 'टॉसवेळी आणि पत्रकार परिषदेदरम्यान गिल ज्या परिपक्वतेने बोलतो, ती फार महत्त्वाची आहे. बीसीसीआय आणि निवड समितीने त्याच्याबाबत संयम ठेवला पाहिजे.'
पहिल्या कसोटीत दमदार शतक
पहिल्या कसोटीत गिलने शतक झळकावून आपल्या फलंदाजी कौशल्याचे जोरदार दर्शन घडवले. जरी दुसऱ्या डावात तो फारशी चमक दाखवू शकला नाही, तरी त्याच्या एकूण कामगिरीतून स्पष्ट झाले की कर्णधारपदाचा दबाव त्याच्या फलंदाजीवर झाला नाही. आता 2 जुलैपासून एजबॅस्टनमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत गिल नेतृत्वात बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. संघाला विजयाच्या मार्गावर परत आणण्यासाठी कर्णधाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.