Sadashiv Raoji Patil Passes Away: भारताचे माजी टेस्ट क्रिकेटर सदाशिव रावजी पाटील यांचे कोल्हापुरात निधन, BCCIने दिला जुन्या आठवणींना उजाळा
भारतीय क्रिकेट टीमचे माजी खेळाडू सदाशिव रावजी पाटील (Photo Credit: Twitter/BCCI)

भारतीय क्रिकेट टीमचे माजी खेळाडू सदाशिव रावजी पाटील (Sadashiv Raoji Patil) यांचे मंगळवारी कोल्हापूर (Kolhapur) येथील निवासस्थानी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (Kolhapur District Cricket Association) माजी पदाधिकारी रमेश कदम यांनी PTIला सांगितले की, “मंगळवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी झोपेत त्यांचा मृत्यू झाला.” सदाशिव रावजी पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. पाटील यांच्या निधनाबद्दल बीसीसीआयने (BCCI) शोक व्यक्त केला आणि त्यांच्या क्रिकेट प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. पाटील यांचा क्रिकेट प्रवास मोठ्या प्रमाणात घरगुती क्रिकेटपुरता मर्यादित होता. 86 वर्षीय पाटील यांनी एका कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 11 मोसमात 36 प्रथम श्रेणी सामने खेळले. 1952-53 च्या हंगामात महाराष्ट्राकडून (Maharashtra) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे पाटील मध्यमगती गोलंदाज होते. त्यांनी 1955 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून डेब्यू केले.

"मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या पाटील यांनी 1952-53 च्या हंगामात महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेटयामध्ये पदार्पणातच झटपट प्रभाव पडला होता. मुंबईविरुद्ध महाराष्ट्र केवळ 167 धावांवर बाद झाल्यांनी मुंबईला 112 धावांवर ऑल-आऊट करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली," बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले. "दुसर्‍या डावात त्यांनी महाराष्ट्राच्या 19 धावांच्या विजयात 68 धावांत तीन गडी बाद केले. पॉली उमरीगरच्या नेतृत्वात 1955 मध्ये न्यूझीलंडच्या विजयी संघाविरुद्ध ब्रॅबोर्न स्टेडियमवर पदार्पण करत बहुमूल्य भारत कसोटी कॅप (नंबर 79) मिळविली. नवीन चेंडूसह गोलंदाजी करत त्यांनी प्रत्येक डावात एक विकेट घेतली आणि भारताने डाव व 27 धावांनी विजय मिळवला. किवींविरूद्ध पश्चिम विभागाकडून खेळताना पाटील यांनी यापूर्वी निवडकर्त्यांना प्रभावित केले होते, ते 7/74 च्या आकडेवारीसह परतले होते."

त्यानंतर ते पुन्हा भारताकडून कधीच खेळले नसले तरी पाटील महाराष्ट्राकडून खेळत राहिले आणि इंग्लंडच्या लँकशायर लीगमध्येही त्यांनी 52 सामन्यांत दोन हंगामात (1959 आणि 1961) 111 विकेट्स घेतल्या. 1952-1964 पर्यंत पाटील यांनी महाराष्ट्राकडून 36 प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्यांनी 866 धावा आणि 83 विकेट घेतल्या. रणजी ट्रॉफी स्पर्धेतही त्यांनी महाराष्ट्राचे कर्णधार म्हणून नेतृत्व देखील केले होते.