हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

“हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत नसला तरी त्याला अष्टपैलू म्हणता येईल का?”, असा सवाल भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी शुक्रवारी केला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा (Indian Team) अविभाज्य भाग असलेल्या पांड्याने नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात केवळ दोन सामन्यांमध्ये गोलंदाजी केली. भारत या स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. आपल्या फिटनेसशी संबंधित अनेक मुद्दे उघड न केल्याने पांड्यावरही टीका होत आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टी-20 मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. भारताने या मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. रॉयल कलकत्ता गोल्फ कोर्समध्ये कपिल म्हणाले, “ऑलराउंडर म्हणायचे असेल तर त्याला दोन्ही करावे लागेल. तो गोलंदाजी करत नसेल तर त्याला अष्टपैलू म्हणायचे का? तो दुखापतीतून सावरला आहे, त्यामुळे त्याला प्रथम गोलंदाजी करू द्या.” (IPL: ‘हार्दिक, तू आता 6-7 कोटींच्या लायक आहे’, आयपीएलच्या दुसऱ्या वर्षी क्रिकेटपटूंसोबत संवादाच्या आठवणीत रमला मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू)

यादरम्यान, भारताचे माजी कर्णधार कपिल देव म्हणाले की, पांड्या गोलंदाजी करत नसल्याने त्याला अष्टपैलू म्हणता येणार नाही. भारताचा पहिला विश्वचषक विजेता कर्णधार म्हणाले, “तो भारतासाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. गोलंदाजी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला बरेच सामने खेळावे लागतात. तरच आपण म्हणू शकतो.” खेळ पुन्हा सुरू झाल्यापासून हार्दिक बहुतांशी एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक फलंदाज म्हणून प्रवास केला आणि इंग्लंडविरुद्ध मायदेशातील मालिकेत त्याच भूमिकेत कसोटी पुनरागमन केले. त्याला लवकरच कसोटी संघातून वगळण्यात आले आणि तेव्हापासून तो या फॉरमॅटमध्ये नाही. दरम्यान, पांड्या न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 सामने खेळला नाही पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो पुनरागमन करू शकतो कारण भारताला तेव्हा एका वरिष्ठ अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता असेल. त्याच्या गोलंदाजीबद्दल अद्याप स्पष्टता नाही आहे. त्यामुळे, तो एक अष्टपैलू म्हणून खेळण्याची शक्यता सध्या धूसर आहे.

याशिवाय राहुल द्रविड हा क्रिकेटपटू म्हणून जितका यशस्वी आहे, त्यापेक्षा तो प्रशिक्षक म्हणून अधिक यशस्वी होईल असेही कपिल यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, “तो एक चांगला व्यक्ती आहे आणि एक चांगला क्रिकेटरही आहे. तो क्रिकेटपटू म्हणून जितका यशस्वी आहे, त्यापेक्षाही तो प्रशिक्षक म्हणून यशस्वी होईल.” तसेच कपिलला त्याच्या आवडत्या अष्टपैलू खेळाडूबद्दल विचारले असता, त्यांनी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाचे नाव घेतले. त्यांनी सांगितले, “आजकाल मी फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जातो. ते माझे काम आहे. मला तुमच्या दृष्टिकोनातून दिसत नाही.”