Freya Davies Retairment: इंग्लंडची महिला वेगवान गोलंदाज फ्रेया डेव्हिसने वयाच्या २९ व्या वर्षीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वकील बनण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असून, तिच्या या पावलामुळे क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का बसला आहे. महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या आधी तिने हा निर्णय घेतला आहे, जरी ती इंग्लंड संघाचा भाग नव्हती. डेव्हिस जवळपास १५ वर्षांपासून क्रिकेटशी जोडली गेली होती आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले होते. मार्च २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून तिने इंग्लंडसाठी पदार्पण केले होते. तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बर्मिंगहॅममध्ये होता.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत करिअर

फ्रेया डेव्हिसने इंग्लंडसाठी ९ वनडे आणि २६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये तिने एकूण ३३ विकेट्स घेतल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २३ धावा देऊन ४ विकेट्स ही तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली. इंग्लंड क्रिकेटने २२ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावरून फ्रेया डेव्हिसच्या निवृत्तीची घोषणा केली आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेगळी ओळख 

केवळ १४ वर्षांच्या असताना फ्रेयाने ससेक्स या काउंटी संघासाठी पदार्पण केले होते. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने वेस्टर्न स्टॉर्म, साउदर्न वाइपर्स आणि हॅम्पशायर यांसारख्या अनेक संघांसाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २०१३ मध्ये ससेक्सने काउंटी चॅम्पियनशिप जिंकली, तेव्हा डेव्हिसने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

वकील बनण्याचा निर्णय

क्रिकेटमध्ये यशाची शिखरे गाठत असतानाच, डेव्हिसने आपल्या शिक्षणावरही लक्ष केंद्रित केले होते. तिने लीगल प्रॅक्टिस कोर्स आणि एलएलएम पूर्ण केले आहे. यामुळेच तिला आता कायद्याच्या क्षेत्रात करिअर करणे सोपे जाईल. डेव्हिसने तिच्या शेवटच्या वनडे कप स्पर्धेत हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व केले होते आणि १४ सामन्यांमध्ये १९ विकेट्स घेत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. यावरून, ती चांगल्या फॉर्ममध्ये असतानाच निवृत्त झाल्याचे दिसून येते.