Hardik Pandya (Photo Credt - X)

मुंबई: टीम इंडियाचा (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता श्रीलंका दौऱ्यावर खेळताना दिसणार आहे. गेले काही महिने हार्दिकसाठी खूप कठीण गेले आहेत. आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्यानंतर पांड्याने वर्ल्ड कपमध्ये शानदार पुनरागमन केले. विश्वचषक संपल्यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला. या सगळ्या दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता हार्दिकसाठी नवीन आदेश जारी केला आहे. हार्दिकचा फिटनेस आणि वनडे फॉरमॅटमध्ये त्याची गोलंदाजी तपासण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.

बीसीसीआयचा नवा आदेश काय आहे?

हार्दिक पांड्या जास्त टी-20 क्रिकेट खेळताना दिसला आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये हार्दिकला अनेकदा दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. पांड्या शेवटचा वनडे विश्वचषक 2023 मध्ये खेळला होता. या स्पर्धेतही हार्दिकला केवळ 4 सामने खेळता आले. त्यानंतर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीत आता बीसीसीआयने हार्दिकला विजय हजारे ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला आहे.

निवड समिती हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीची फिटनेस तपासणार

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुखापतीनंतर हार्दिकला दीर्घ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. टी-20 क्रिकेटमध्ये फक्त 4 षटके टाकता येतात. अशा परिस्थितीत आता निवड समिती विजय हजारे ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीची फिटनेस तपासणार आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma Milestone: रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिला कर्णधार)

हार्दिकची दुखापत चिंतेची बाब

हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियासाठी वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेसोबतच्या टी-20 मालिकेसाठीही पांड्याला कर्णधार बनवण्यात आलेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून आता पांड्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. त्याची तंदुरुस्ती आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कामगिरी यावरून पांड्याचे वनडे संघातील स्थान निश्चित होईल.