BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांचा अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांना स्पष्ट संदेश, म्हणाले - ‘देशांतर्गत क्रिकेट खेळणे पुन्हा सुरु करा’
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

भारतीय कसोटी संघाचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या फॉर्मवर गेल्या काही काळापासून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याशिवाय दोंघांच्या टीम इंडियातील (Team India) स्थानावर देखील आक्षेप घेतला जात आहे. भारतीय कसोटी संघातील या दोघांच्या संघर्षामुळे त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली आहे. भारतीय कसोटी संघातील त्यांची वेळ आधीच संपुष्टात आली आहे असे काहींना वाटते, तर बीसीसीआय (BCCI) प्रमुख सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या दोघांना रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) परत जाण्याचा सल्ला दिला आहे. गांगुलीने स्पोर्टस्टारशी संवाद साधताना पुजारा आणि रहाणेच्या स्थितीबद्दल विचारले. भारताच्या माजी कर्णधारने या दोघांना स्पष्ट संदेश दिला आणि तो म्हणजे देशांतर्गत क्रिकेट खेळणे पुन्हा सुरू करणे. (BCCI Central Contracts: बीसीसीआय करारात तीन खेळाडूंचे डिमोशन पक्के, केएल राहुल आणि रिषभ पंत यांना प्रमोशन नाहीच - Report)

उल्लेखनीय म्हणजे 2005 मध्ये गांगुली स्वतः रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी परतला होता. देशांतर्गत भरपूर धावा केल्यानंतर गांगुलीने भारतीय संघात जोरदार पुनरागमन केले. अशा परिस्थितीत त्याला आता पुजारा आणि रहाणेसाठीही तोच मार्ग दिसत आहे. “ते खूप चांगले खेळाडू आहेत. आशा आहे की ते रणजी ट्रॉफीमध्ये परततील आणि भरपूर धावा करतील, ज्याची मला खात्री आहे. इतके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये परत जाण्यासाठी मला कोणतीही अडचण दिसत नाही. रणजी करंडक ही एक मोठी स्पर्धा आहे आणि आम्ही सर्वांनी ही स्पर्धा खेळली आहे,” गांगुली म्हणाला. “त्यामुळे तेही तिथे परत जाऊन परफॉर्म करतील. ते पूर्वी फक्त कसोटी क्रिकेट खेळत असताना आणि वनडे किंवा मर्यादित षटकांच्या संघाचा भाग नसताना त्यांनी ही स्पर्धा खेळली आहे. त्यामुळे, ही समस्या होणार नाही.”

दरम्यान, देशांतर्गत रेड-बॉल स्पर्धा आता काही काळापासून शक्य झालेली नाही. यंदाही रणजी करंडक दोन टप्प्यात होणार आहे. ही भारतातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असून गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली होती. तथापि यावर्षी रणजी ट्रॉफी 2022 चा हंगाम 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि त्याचा पहिला टप्पा 5 मार्चपर्यंत खेळला जाईल. तसेच स्पर्धेचा दुसरा टप्पा आयपीएलनंतर जूनमध्ये होणार आहे.