ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच या गोष्टीत आढळला दोषी; टी 20 सामन्यांपुर्वी होणार कारवाई
अ‍ॅरोन फिंच (Photo Credit : Youtube)

भारताने ऑस्ट्रेलियावर मात करून ऐतिहासिक विजय प्राप्त केला. आता रविवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये टी 20 सामने सुरु होणार आहेत. भारताचा पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आक्रमक खेळी करेल यात काही शंका नाही. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच (Aaron Finch) वर कारवाई करण्यात येणार आहे. बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात लेव्हल -1 नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिंच दोषी आढळला आहे. फिंचचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, यामध्ये फिंच खुर्चीवर आपला राग काढताना दिसत आहे, यामुळेच फिंच अडचणीत सापडला आहे.

मेलबर्न रेनेगेड्स संघाने बिग बॅश लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेलबर्न स्टार्सला पराभूत केले. विजेतेपद प्राप्त करूनही, फिंच या अंतिम सामन्यात यशस्वी कामगिरी करू शकला नाही. अवघ्या 13 धावात त्याचा बळी गेला, या गोष्टीचा राग त्याने खुर्चीवर आपली बॅट आपटून व्यक्त केला. लेव्हल 1 पद्धतीच्या नियमाचे उल्लंघन केले. 2.1.2 कलमान्वये मैदानावरील सामानाची तोडफोड करण्याच्या गुन्ह्यात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. या कृत्यामुळे अ‍ॅरोन फिंचला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

बॉब स्ट्रँटफोर्ड यांनी फिंचला दोषी जाहीर केले आहे, फिंचने देखील आपली चूक मान्य केली आहे. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील.