Mumbai’s R-Value: दिलासादायक! मुंबईची आर-व्हॅल्यू आली एकच्या खाली; Covid-19 संक्रमणाचा दर घटला 
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देणाऱ्या महाराष्ट्राला आता कुठे दिलासा मिळाला आहे. या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. नुकतेच महामारी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबईमध्ये एका दिवसात एकही कोरोना रुग्ण दगावला नाही. आता ऑक्टोबरच्या पूर्वार्धामध्ये एक पेक्षा जास्त असलेली मुंबईची आर-व्हॅल्यू (Mumbai’s R-Value) एकच्या खाली आली आहे. आर-व्हॅल्यू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव किती वेगाने पसरत आहे हे दर्शवते.

चेन्नई स्थित गणिती विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की कोविड-19 ची मुंबईची आर-व्हॅल्यू 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान 0.94 राहिली आहे. 'आर' क्रमांक हे दाखवते की आजारी व्यक्ती सरासरी किती लोकांना संक्रमित करते. दुसऱ्या शब्दांत, सांगायचे तर या व्हॅल्यूवरून हे समजते की व्हायरस किती 'प्रभावीपणे' पसरत आहे.

जर 'R'  व्हॅल्यू एकपेक्षा कमी असेल तर रोग वेगाने कमी होत आहे असे समजावे. जर 'आर' एकापेक्षा जास्त असेल तर संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे हे समजावे. जर 'आर' एकपेक्षा जास्त असेल तर लोकसंख्येमध्ये रोगाचा प्रसार होण्याचा वेग वेगवान आहे असे समजावे. (हेही वाचा: Maharashtra Unlock: मुंबईतील दुकाने आणि रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार, पहा राजेश टोपे नेमके काय म्हणाले)

28 ते 30 सप्टेंबर दरम्यान मुंबईमधील आर-व्हॅल्यू 1.03 असल्याचे संशोधकांनी सांगितले. आर्थिक राजधानीमध्ये 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आर- व्हॅल्यू 1.01 होती आणि 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ती 1.05 होती. त्यानंतर आता 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ती एकपेक्षा कमी झाली. दरम्यान, मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 313 रुग्णांची नोंद झाली असून 511 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के झाला आहे. सध्या शहरात 4650 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.