Shocking Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमधील वादाने हिंसक रूप धारण केले व त्यातील एकाने दुसऱ्याला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले. शनिवारी रात्री हावडा-मालदा इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, भांडणानंतर एक प्रवासी दुसऱ्याला ट्रेनमधून ढकलून देत आहे.

ट्रेनमधून ही व्यक्ती खाली पडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत वाचवण्यात आले. रेल्वेच्या सूत्रांकडून त्याची ओळख पटली आहे. सजल शेख असे पीडितेचे नाव आहे. तो बीरभूममधील सुंदीपूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सजलने कबूल केले की, तो मद्यधुंद अवस्थेत ट्रेनमध्ये चढला होता, जे चुकीचे होते. मात्र सहप्रवाशाच्या एका 'वाईट कृत्य' मध्ये अडथळा आणल्याने त्याला ट्रेनमधून फेकून देण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.

सजलने सांगितले की, तो दारूच्या नशेत इंटरसिटी एक्सप्रेसने घरी येत होता. त्यावेळी ट्रेनमधील तीन-चार प्रवासी एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यांच्या शेजारी काही कुटुंबीय बसले होते. शिवीगाळ करणाऱ्या लोकांना सजलने शांत राहण्यास सांगितले. त्याचवेळी त्या लोकांनी सजलची कॉलर पकडली. त्यांना मारण्यासाठी सजलने त्याच्या खिशातून ब्लेड काढले. त्यानंतर भांडण वाढत गेले व त्यातील एकाने सजलला ट्रेनमधून फेकले. (हेही वाचा: Viral Video: धक्कादायक! डोळा दुखतो म्हणुन महिला नेत्र तज्ञांकडे गेली, बघते तर काय डोळ्यात तब्बल २३ आयलेन्स, नेत्रतपासणी करताना डॉक्टरही चक्रावले)

सजलला जेव्हा जाग आली तेव्हा तो रेल्वे लाईनवर पडलेला होता. आधी त्याच्यावर रामपुरहाट मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते व सध्या तो स्थानिक रुग्णालयात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना तारापीठ आणि रामपुरहाट दरम्यान घडल्याचा दावा सजलने केला आहे. ट्रेनमधील अन्य एका प्रवाशाने काढलेला व्हिडिओ पाहून रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.