TikTok नंतरचे जीवन! 'Chicken Leg Piece' द्वारे व्हायरल झालेल्या Ulhas Kamathe यांनी घाटकोपर येथे सुरु केले नवे रेस्टॉरंट, मांसाहार प्रेमींसाठी ठरेल पर्वणी (See Photos)
‘Chicken Leg Piece’ Internet Sensation Ulhas Kamathe (Photo Credits: ulhaskamthe/ Instagram)

टिकटॉक (TikTok) वरील छोट्या छोट्या व्हिडिओंमुळे बरेच लोक सेलिब्रेटी झाले आहेत. काही लोकांमध्ये गाण्याचे कौशल्य होते, तर काही जण उत्तम डान्सर होते. अशा लोकांना टिकटॉकने एक फेम मिळवून दिली होते. टिकटॉकवर असाच आपल्या हटके स्टाईलमुळे एक मराठी नाव लोकप्रिय झाले होते, ते म्हणजे उल्हास कामठे (Ulhas Kamathe). आज टिकटॉक जरी बंद झाले असले तरी उल्हास कामठे हे नाव चर्चेत असते. उल्हास यांचे ‘चिकन लेग पीस’ (Chicken Leg Piece) खाण्याचे व्हिडिओज अतिशय लोकप्रिय ठरले होते. आता उल्हास यांचे नाव पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, कारण त्यांनी आता मुंबईमध्ये आपले छोटेसे रेस्टॉरंट सुरु केले आहे.

41 वर्षीय उल्हास कामठे हे अतिशय फुडी आहेत. विविध पदार्थांचा आनंद घेतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. वेगवगेळ्या डिशेश चवीने खाणे हा त्यांचा छंदच म्हणून शकतो. आता माजी टिकटॉकर आणि जिमचे मालक असलेल्या उल्हास कामठे यांनी आपल्या ‘चिकन लेग पीस’ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन, मांसाहार प्रेमींसाठी याच नावाने एक छोटे रेस्टॉरंट सुरु केले आहे. 18 ऑक्टोबर पासून मुंबईच्या घाटकोपरमध्ये कामठे यांचे नवीन रेस्टॉरंट सुरु झाले असून, त्यासमोर उभे राहून पोझ देतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सोशल मिडियावर कामठे लोकप्रिय आहेतच मात्र आता या रेस्टॉरंटद्वारे त्यांना भेटण्यासाठी आणि तिथल्या काही स्वादिष्ट पाककृती चाखण्यासाठी लोक उत्सुक आहेत. ‘चिकन लेग पीस’ हा प्रत्येक मांसाहर प्रेमीचा आवडता पदार्थ आहे. म्हणूनच कामठे यांचे चिकन लेग पीसचे व्हिडिओ लोकप्रिय झाले. उल्हासच्या व्हिडिओंची क्रेझ केवळ भारतामध्येच नाही, परदेशी लोकांमध्येही आहे. लोक त्यांच्यासह मजेदार ड्युएट व्हिडिओ तयार करीत असत. उल्हास यांनी इतर अनेकांच्या सोबत कोलॅबरेशन करूनही व्हिडिओ बनवले आहेत. (हेही वाचा: कोरोना वॉर्डातील डॉक्टरांनी धरला बॉलिवूड गाण्यावर ठेका: व्हायरल व्हिडिओ पाहून हृतिक रोशन म्हणाला, 'मलाही या डान्स स्टेप्स शिकायच्या')

सध्या युट्यूबवर ते फारच सक्रीय आहेत. युट्यूबवर त्यांचे थाळी खाण्याचे व्हिडिओ लोकप्रिय ठरत आहेत. आता कामठे यांनी रेस्टॉरंटद्वारे नवीन सुरुवात केली आहे. तरी तिथे भेट देऊन तुम्ही तिथल्या पदार्थांवर ताव मारू शकता.