Ghaziabad Youth Dies Treadmill: गाझियाबादमध्ये ट्रेडमिलवर धावताना 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Ghaziabad Youth Dies Treadmill (PC - You Tube/TOI)

Ghaziabad Youth Dies Treadmill: गाझियाबाद (Ghaziabad)च्या सरस्वती विहार परिसरात एका जिम (Gym)मध्ये ट्रेडमिलवर धावताना एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, धावत असताना या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ट्रेडमिलवर धावताना तो पडला. या अपघाताचा व्हिडिओ जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंदिरापुरमचे एसीपी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. गाझियाबादमधील खोडा पोलीस स्टेशन परिसरातील हे प्रकरण आहे. सिद्धार्थ कुमार असे मृताचे नाव असून तो आपल्या कुटुंबासह सरस्वती विहार परिसरात राहतो. सिद्धार्थ त्याच्या घराजवळील जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जात असे. दररोजप्रमाणेच सिद्धार्थ शनिवारीही जिमला गेला. तेथे तो ट्रेड मिलवर चालू लागला. यादरम्यान तो अचानक बेशुद्ध झाला. हे पाहून तेथे उपस्थित असलेले आणखी दोन लोक त्याच्याकडे आले. त्यांना त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.

ही घटना 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बाबा जिममध्ये घडली. सिद्धार्थला जवळच्या रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सिद्धार्थचे कुटुंब मूळचे बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे. तो गाझियाबादमध्ये शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या दुःखद घटनेच्या 10 मिनिटे आधी सिद्धार्थचे आईशी बोलणे झाले होते. तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील बिहारमधील त्याच्या मूळ गावी सिवान येथे घेऊन गेले. (हेही वाचा - Mumbai Innova Accident Video: मुंबईतील चांदिवली परिसरात 14 वर्षीय मुलाने चालवली पालकांची SUV; गेटमधून बाहेर निघताच दिली ज्येष्ठ नागरिकाला धडक, Watch Viral Video)

दरम्यान, वर्कआउट करताना एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 46 वर्षीय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचाही जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. सिद्धांतला जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याआधी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा वर्कआउट दरम्यान मृत्यू झाला होता.