Fact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र? Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य

‘या लसीमध्ये ग्राफिन ऑक्साईड असून, ज्याने हे या लसीमध्ये टाकले आहे तो शास्त्रज्ञ म्हणत आहे की, 70 टक्के पेक्षा जास्त ग्राफिन ऑक्साईड लोकांच्या शरीरात गेल्यास ती व्यक्ती 10 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही.’

Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्यावर्षी फेब्रुवारी-मार्चपासून देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घालायला सुरुवात केली. या विषाणूवर मात करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण (Vaccination) मोहीम राबवली जात आहे, मात्र अजूनही सोशल मिडियावर हा व्हायरस आणि लसबाबत अनेक खोटे मेसेजेस व्हायरल होत आहेत. आताही एक ऑडिओ संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका डॉक्टरने कोरोना विषाणू लसीबाबत अनेक खोटे दावे केले आहेत. या लसीमध्ये ग्राफिन ऑक्साईड असून, कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र असल्याचे या संदेशामध्ये म्हटले आहे.

आता पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल बातमीची सत्यता पडताळली आहे व हा दावा खोटा असल्याचे सांगत तो फेटाळण्यात आला आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटले आहे की, ‘कोरोना विषाणू ही खोटी गोष्ट आहे व या विषाणूविरुद्ध देण्यात येत असलेल्या लसीमधील एक महत्वाच्या घटकाबाबत मी लोकांना जागरूक करत आहे. भारत सरकार व आरोग्य विभाग हे म्हणतोय की ही लस म्हणजे अजूनही एक ट्रायल आहे. लोकांवर याचा कसा व कितपत परिणाम होणार हे अजूनही माहित नाही. ही लस एकप्रकारे लोकांना मारण्याचे षडयंत्र आहे.’

यामध्ये पुढे सांगण्यात आले आहे. ‘या लसीमध्ये ग्राफिन ऑक्साईड असून, ज्याने हे या लसीमध्ये टाकले आहे तो शास्त्रज्ञ म्हणत आहे की, 70 टक्के पेक्षा जास्त ग्राफिन ऑक्साईड लोकांच्या शरीरात गेल्यास ती व्यक्ती 10 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही.’

यावर पीआयबीने म्हटले आहे की, ‘कोरोना व्हायरस खोटी गोष्ट नसून ती वैश्विक महामारी आहे. कोविड लसीमध्ये ग्राफिन ऑक्साईड नाही. ही लस स्वैच्छिक आहे, परंतु कोविड-19 पासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. भारतामधील सर्व लसींना डीसीजीआयद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.’ तर अशाप्रकारे ऑडिओ संदेशामधील सर्व दावे खोटे असल्याचे समोर आले आहे.