Fact Check: ऑक्सीजन सिलेंडर ऐवजी Nebuliser चा वापर करू शकतो? जाणून घ्या Viral Video मागील सत्य
Oxygen Cylinder (Photo Credits: (Wikimedia Commons)

भारतामधील कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात आता तर दररोज 3 लाखापेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे बरेच लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अशा वेळी असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कोरोना रूग्णांना ऑक्सिजनऐवजी नेब्युलायझर (Nebuliser) मशीन वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांनी ही गोष्ट आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. फरिदाबादच्या सर्वोदय रुग्णालयातील डॉक्टर अलोक यांचा हा व्हिडीओ आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये स्वत: ला सर्वोदय रुग्णालयाचा डॉक्टर म्हणवणारी व्यक्ती कोरोना रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना ऑक्सिजनऐवजी नेब्युलायझर मशीन वापरण्याचा सल्ला देत आहेत. या व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की, वातावरणात पुरेसा ऑक्सिजन आहे, जो नेबुलायझर मशीनच्या सहाय्याने घेतला जाऊ शकतो. त्यानंतर आता सर्वोदय हॉस्पिटलने ट्विट करत, ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी नेब्युलायझरबाबतचा व्हायरल व्हिडिओ खोटा असून यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे.

रुग्णालयाच्या वतीने असे सांगितले गेले आहे की, हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारच्या वैज्ञानिक अभ्यासावर आधारित नाही. तसेच सर्वोदय रुग्णालयाच्या वतीने या व्हिडीओमधील दावा पूर्णपणे नाकारला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा प्रकार वापरू नका, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच हा प्रकार आपल्याला आणखीन आजारी बनवू शकतो असेही म्हटले आहे. लिव्हर ट्रान्सप्लांटेशन अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन, मेदांता या संस्थेचे अध्यक्ष डॉ अरविंदरसिंग सोईन यांनीही हा व्हिडीओ तथ्यहीन असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: 18 वर्षांवरील व्यक्ती 24 एप्रिल पासून करु शकतात COVID19 Vaccine साठी रजिस्ट्रेशन? PIB ने केला खुलासा)

कोणताही उपचार करण्यापूर्वी नेहमी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्या, डॉक्टरांशी बोला असे सर्वोदय हेल्थकेअरने सांगितले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून सर्वोदय रुग्णालयाने डॉ. आलोक यांच्याकडे जाब विचारला असता, त्यांनी चुकीचा संदेश त्यांच्याकडून गेल्याचे स्पष्टीकरण दिले. ऑक्सिजन सिलिंडरऐवजी नेब्युलायझर मशीन वापरणे चुकीचे आहे, ही योग्य पद्धत नाही असे सांगत त्यांनी माफी मागितली आहे.