आजवर आपण सत्तेसाठी होणारी भांडणे पहिली असतील. अर्थात अलीकडच्या पेटलेल्या राजकारणात ही भांडण काही नवीन नाहीत, मात्र अमेरिकेतील कोलोराडो राज्यात अगदी न भांडता संगनमताने एका महापौर (Mayor)पदाची निवड करण्यात आली आहे, आश्चर्य म्हणजे या निवडीसाठी ना कोणी विरोधी होते ना कोणत्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोपाचा सुरु करण्यात आला होता. उलट सर्वांनी प्रेमानी आणि एकमताने आपल्या उमेदवाराला महापौर पदी नेमून दिल्याचे समजत आहे. आता तुम्ही म्हणाल की इतका प्रिय नेता नेमका आहे तर कोण? तर हा कोणी व्यक्ती नसून चक्क एक कुत्रा आहे. होय, कोलाराडो (Colarado) येथील जॉर्जटाउन (Georgetown) शहरात पार्कर (Parker) या सेलिब्रिटी कुत्र्याची महापौर पदी नेमणूक झाली आहे. इतकंच नव्हे तर जॉर्जटाउन कम्युनिटी सेंटरमध्ये त्याचा शानदार शपथविधी सोहळा पार पडला.
पार्करच्या शपथविधी सोहळ्याला स्थानिकांसह अनेक श्वान प्रेमी नागरिकांनी हजेरी लावली होती. पार्करला पोलीस आणि न्या. केलसी यांनी महापौरपदाची शपथ दिली. महापौरपदाची शपथ पदभार सांभाळण्यासाठी पार्कर टाय, कॅप, चष्मा अशा वेशभूषेत आला होता. या खास शपथविधी सोहळ्याचे फोटो क्लिअर क्रिक कौंटीच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले. आणि अर्थात हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झालेत.
पार्कर शपथविधी सोहळा
दरम्यान, पार्कर विषयी सांगायचे झाले तर हा एक सेलिब्रेटी श्वान आहे. इन्स्टाग्रामवरही त्याचे अकाउंट असून त्याचे 16 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. पार्कर हा लवलँड स्की परिसराचा मॉस्कट आहे. त्याशिवाय त्याने रॉकी माउंटनमधील एका गावातील थेरेपी कॅम्पमध्येही सहभागी घेतला होता, आणि आता यापुढे तो जॉर्जटाउनचा महापौर म्हणून काम पाहणार आहे.