यवतमाळ बस डेपोचा चेहरामोहरा बदलणार, येथे हलविण्यात येणार पर्यायी व्यवस्था
Yavatmal Bus Depo (Photo Credits: Wiki Commons)

राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ बसस्थानकाचे रुपडं लवकरच पालटणार आहे. हे नवीन बसस्थानक नवनवीन आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल अशी माहिती यवतमाळचे (Yavatmal) विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी लोकमतशी बोलताना दिली. हे नवीन बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून आर्णी मार्गावरील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या परिसरात हे बसस्थानक महिन्याभरासाठी हलविण्यात येणार आहे. यामुळे बस प्रवाशांची गैरसोय होणार असली तरीही हे करणे गरजेचे आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

यवतमाळचे बसस्थानक राज्यातील उत्तम दर्जाचे बसस्थानक म्हणून नावारूपास यावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाने काही खास नियोजन केले आहे. 12 कोटी रूपयांचा निधी खर्च करून हे बसस्थानक जुन्या जागेवरच उभारले जाणार आहे. सोलर लॅम्प, तळघरात दुचाकी वाहनांची पार्किंग आणि विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.

हेही वाचा- रेल्वे स्थानक, विमानतळ आणि मॉल मध्ये लवकरच मिळणार मटक्यामधील चहा, नितिन गडकरी यांचा नवा प्लान

तसेच या बसस्थानकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी जुने बसडेपो तोडण्यात येणार आहे. त्यामुळे आर्णी मार्गावरील राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयातील जागेवर पर्यायी व्यवस्था पुढील महिन्याभरासाठी सुरु राहणार आहे.

तसेच या बसस्थाकांच्या पुर्नबांधणीमुळे येथील दुकानदारांनाही नोटीसा बजावल्या आहेत. बसस्थानकाच्या पर्यायी जागेवर युद्धपातळीवर काम सुरु झाले असून लवकरच यवतमाळ बसस्थानक तेथे हलविण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.