Sai Paranjape Gets Sahitya Akadami Award (Photo Credits: Facebook)

प्रसिद्ध लेखिका, नाटककार आणि दिग्दर्शिका सई परांजपे (Sai Paranjape) यांना 2019 या वर्षासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा (Nasaruddin Shah)  यांच्या 'अँड देन वन डे' (And Then One Day) या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद 'आणि मग एक दिवस' या पुस्तकाला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 50हजार रुपये रोख आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय, औरंगाबाद येथील विख्यात कवी, लेखक, अनुवादक अस्लम मिर्झा (Aslam Mirza) यांनाही अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीतील कवी प्रशांत असणारे यांच्या 'मीच माझा मोर' या कविता संग्रहाचा उर्दू अनुवाद असलेल्या 'मोरपंख' या कविता संग्रहासाठी मिर्झा यांना हा पुरस्कार मिळाला आहे. Padma Award 2020: अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिससह 7 जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर; पहा संपूर्ण यादी

दिल्लीतील रविंद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध 23 पुस्तकांची 2019 साठीच्या अनुवाद पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली, ज्यात सई परांजपे यांच्या या पुस्तकाची देखील नोंद घेण्यात आली. मराठीसह 23 भाषांमधील अनुवादकांना 2019 या वर्षासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे.

दरम्यान, पुस्तकांची निवड त्या त्या भाषांतील त्रिसदस्यीय समितीने केली. मराठी भाषेसाठीच्या निवड समितीत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार, निशिकांत ठकार यांचा समावेश होता. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी पुरस्कारांचा तपशील जाहीर केला.