लाच घेताना महिला वाहतूक पोलिस कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
वाहतूक महिला पोलिस लाच घेताना कॅमेऱ्यात कैद (Phoro Credits: Twitter)

वाहतूकीच्या नियम पाळण्याच्या बाबतीत आपल्याकडे अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. अशांना जरब बसवण्यासाठी वाहतूक पोलिस असतातच. मात्र पोलिसच नियम धाब्यावर बसवायला लागले तर काय करायचे? अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिंपरी येथील या व्हिडिओ असून यात एक महिला पोलिस थेट खिशात लाच स्वीकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्या भागात जवळच इतर वाहतूक पोलिसही हजर होते. मात्र त्यांची नजर चुकून या महिला वाहतूक पोलिसांनी गुपचूप लाच स्वीकारली.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एका दुचाकीवरील दोन महिलांना पोलिसांनी अडविले, त्यापैकी एका महिलेने तेथील महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या जवळ जाते. त्यानंतर पोलिस महिला त्या तरुणीला काहीतरी सांगते आणि त्यानंतर तरुणी पोलिस महिलेच्या मागच्या खिशात पैसे ठेवते. हा व्हिडिओ पिंपरी येथील साई चौक येथील असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत चोकशी करुन त्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल असे पिंपरी चिंचवडच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले आहे.

पहा व्हिडिओ:

वाहतूकीच्या नियमांचे पालन होते की नाही, याची पाहाणी करण्यासाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे प्रवाशांसह वाहतूक पोलिसांवर नजर ठेवतात. तरी देखील अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. यातून आपले कर्तव्य बजावताना स्वयंशिस्त आणि जबाबदारीची जाणीव या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड येथील साई चौक आणि शगुन चौकात वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पोलिसांची ही वर्तवणूक बेशिस्तीला खतपाणी घालत आहे.