'सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ', नाना पटोले यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
Nana Patole and Devendra Fadnavis (Photo Credits: PTI)

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सडकून टिका केली होती. त्या टिकेला उत्तर नाना पटोले यांनी आज एक ट्विट केले आहे. "सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात" असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

"सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे" असे देखील नाना पटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Rohit Pawar Speech in Rain: रोहित पवार यांनी ठोकले पावसात भाषण, अनेकांना आली शरद पवार यांच्या सभेची आठवण

नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचं शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी "नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहितीये की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोललं, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचंच भलं आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचं नाव कमवायचं आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसं आणि कोण बंद करू शकतं? इथे कायद्याचं राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात" अशा शब्दांत टिका केली होती.

काय म्हणाले होते नाना पटोले?

"एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का?… ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली, तर भाजपा नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?" असे सांगत अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर निशाणा साधला होता.