Legislative Council Election 2020: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय दौंड विधानपरिषदेवर बिनविरोध, भाजपच्या राजन तेली यांचा अर्ज मागे

दरम्यान, संख्याबळाच्या कारणामुळे भाजपने आपले उमेदवार तेली यांचा निवडणूक अर्ज मागे घेतला.

Sanjay Daund | (File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( Nationalist Congress Party) उमेदवार संजय दौंड (Sanjay Daund) यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजप (BJP) उमेदवार राजन तेली (Rajan Teli) यांनी संख्याबळाच्या कारणावरुन अर्ज मागे घेतल्याने दौंड यांचा मार्ग मोकळा झाला. धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर तयार झालेल्या रिक्त जागेसाठी ही निवडणूक पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे तानाजी सावंत (Tanaji Sawant) या दोन सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अनुक्रमे बीड (Beed) आणि यवतमाळ (Yavatmal) या दोन्ही ठिकाणी लागलेल्या निवडणुकीत महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी बीडच्या जागेचा निवडणुकीपूर्वीच निकाल लागला आहे. त्यामुळे आता यवतमाळच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दोन्ही जागांसाठी 14 जानेवारी या दिवशी सर्व उमेदवारांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला होता. बीड (Beed) येथील विधानपरिषद जागेसाठी येत्या 24 जानेवारीला मतदान पार पडणार होते. तर, यवतमाळ (Yavatmal) येथून भरल्या जाणाऱ्या जागेसाठी 31 जानेवारी या दिवशी मतदान पार पडत आहे.

संजय दौड हे राज्याचे माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील मोठे नाव पंडीतराव दौंड यांचे चिरंजीव आहेत. पंडीत दौंड यांनी 1985 मध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. पंडीतराव दैंड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे हे संबंध जपत तसेच विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. संजय दौंड हे गेली अनेक वर्षे बीड जिल्हा परिषद राजकारणात अग्रेसर आहेत.

दुसऱ्या बाजूला भाजपचे राजन तेली हे कोकणातील आहेत. विधानसभा निवडणूक 2020 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणूक 2020 शिवसेना-भाजप युतीद्वारे लढले होते. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे इथे भाजप उमेदवार उभा नव्हता. परंतू, तेली हे भाजपचे असल्याने त्यांनी इथे अपक्ष निवडणूक लढवली होती. नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिवसेनेची कोकणामध्ये कोंडी करण्यासाठी भाजपने रसद पुरवली होती. तेली हा या रसदीचाच भाग होता असे बोलले जाते. दरम्यान, राजन तेली यांनी आपला निवडणूक अर्जच मागे घेतल्यामुळे संजय दौंड हे विधानपरिषदेवर बिनविरोध निवडूण गेले आहेत.