Vasudev Narayan Utpat (फोटो सौजन्य- Twitter)

Vasudev Narayan Utpat Dies: पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, भागवताचार्य वा. ना. उत्पात तथा वासुदेव नारायण (Vasudev Narayan Utpat) यांचे कोरोनामुळे (Coronavirus) निधन झालं आहे. 80 वर्षींय उत्पात यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंढरपूरकरांना या घटनेमुळे मोठा धसका बसला आहे.

वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक होते. उत्पात हे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुर्मासात भागवत सांगत असतं. श्रीमदभागवताचा अखंड ज्ञानयज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून उत्पात यांच्या हातून अविरतपणे सुरू होता. पंढरपूरमध्ये उत्पात चातुर्मासात ज्ञानेश्वरी प्रवचने करत असतं. (हेही वाचा -Coronavirus Vaccine Trial In KEM Hospital: ‘कोव्हीशिल्ड’ लस चाचणी दरम्यान मृत्यू झाल्यास स्वयंसेवकाच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटी रुपये)

भागवताचार्य वा. ना. उत्पात हे रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी होते. 39 वर्षे त्यांनी कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे संस्कृत, मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयाचे अध्यापन केले. त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. याशिवाय त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले होते.

उत्पात यांनी सेवानिवृत्त झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह, प्रवचने केली. विविध विषयांवर व्याख्याने दिली. पंढरपुरातील समाजकारण, राजकारण या मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. मागील आठवड्यामध्ये पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे कोरोनामुळे निधन झालं होतं.