Maharashtra Weather Update: मार्च (March) महिन्याच्या आज पहिल्या दिवशी आता उन्हाळा तीव्र होण्याच्या दिवसामध्ये मुंबई, पुण्यात अवकाळी पावसाच्या (Unseasonal Rain) सरी बरसल्या आहेत. काल उन्हाचा कडाका असताना आज रिमझिम पावसामुळे वातावरण थोडं थंड झालं आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील 2-3 दिवस मेघागर्जनेसह जोरदार पाऊस बरसणार आहे. तर काही भागात गारपीटीची (Hailstorm) शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्येही पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Weather Update: महाराष्ट्रासह 15 राज्यांना अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा .
महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज काय?
पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बराचसा भाग, मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव मध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. 2-3 मार्च दरम्यान छत्रपती संभाजीनगर भागात गारपीटीची शक्यता आहे. तर विदर्भातही अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातही गारपीट होण्याचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाचा फटका प्रामुख्याने शेतकर्यांना बसणार आहे. अनेक पीकांचे यामुळे नुकसान होणार आहे.
मुंबई मध्ये मागील काही दिवसात कमाल तापमान 37 अंशांपर्यंत पोहचले होते. त्यामुळे नागरिकांची उन्हाने काहिली होत होती. अशातच मुंबई मध्ये पाणी संकट घोंघावत आहे. सध्या 5 मार्च पर्यंत 15% पाणीकपात आहे. तर जलसाठा कमी होत असल्याने पाणी कपात पुढे कायम राहणार का? याकडे नागरिकांचे लक्ष आहे.