राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपले समर्थक आमदार आणि गटाची शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक दुपारी 12.30 वाजता मुंबईत (Mumbai) पार पडणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि नेते बैठकीला उपस्थित राहतील असे सांगण्यात आले आहे. "शिवसेना" पक्षाचे शीर्षक आणि निवडणूक चिन्ह "धनुष्यबाण" निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आल्याने बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खास करुन राजकीय वर्तुळातून.
निवडणूक आयोगाचा निर्णय येताच ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोग आणि देशातील विविध यंत्रणा या भारतीय जनता पक्षाच्या हस्तक आणि गुलाम झाल्या आहेत, असा हल्ला ठाकरे गटाने चढवला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण)
दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात असे निरीक्षण नोंदवले आहे की, शिवसेना पक्षाची सध्याची घटना लोकशाहीविरोधी आहे आणि "कोणत्याही निवडणुका न घेताच एका गटातील लोकांना अलोकतांत्रिक पद्धतीने पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यासाठी अधिकार आणि नियमांचा विपर्यास करण्यात आला आहे. ज्यामुळे अशी पक्ष रचना आत्मविश्वास आणि लोकशाही निर्माण करण्यास अपयशी ठरते.
गेल्या महिन्यात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावरील त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदने सादर केली. त्यानंतर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 'धगधगती मशाल' निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे गटाला देण्यात आले होते. तर, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला 'ठाल आणि तलवार' चिन्ह दिले होते.