प्राण्यांची शिकार करु नका असे शासनाकडून वारंवार सांगितले जात असताना प्राण्यांची तस्करी करणे काही बंद होत नाही. त्यात बिबट्याच्या(Leopard) कातड्याची तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला असता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये बिबट्याच्या कातड्याची तस्करी करत असल्याचा गुन्हा समोर आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने वागळे इस्टेट परिसरातून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश शिवराज अरोरा (44) राहणारा मुलूंड कॉलनीतला आणि मोजीस ऊर्फ मोजा कापरेण अगीमणी (30) राहणारा धारवाड अशी ह्या आरोपींची नावे आहेत.
बिबळ्याची कातडी विक्रीसाठी हे दोघे आरोपी वागळेतील कामगार रुग्णालयासमोर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना अटक केली. यावेळी अरोरा याच्याकडून एक बिबळ्याचे कातडे हस्तगत करण्यात आले. १८ लाख रुपयांना आरोपी या कातड्याची विक्री करणार असल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे.
मात्र आरोपींनी हे कातडे कुठून आणले आणि कोणाला विक्री करणार होते याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.