Torres Company Scam: मुंबईत टॉरेस ज्वेलरी कंपनीद्वारे तब्बल 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटींची फसवणूक; तीन जणांना अटक, सूत्रधार युक्रेनला पळाले, प्रकरण EOW कडे हस्तांतरित
टॉरेस कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईत ऑपरेशन सुरू केले. त्यांनी दादरमध्ये फ्लॅगशिप शोरूम आणि नवी मुंबई, कल्याण, बोरिवली आणि मीरा रोड येथे शाखा उघडल्या. लोकांची फसवणूक करण्यासाठी कंपनीने एक आकर्षक गुंतवणूक योजना ऑफर केली. यामध्ये 6% चा साप्ताहिक परतावा आणि 52 आठवड्यांत गुंतवणुकीच्या मूल्याच्या तिप्पट रक्कम देण्याचे वचन दिले होते.
Torres Company Scam: टॉरेस ज्वेलरी कंपनीच्या (Torres Jewelry Company) मोठ्या गुंतवणुकीच्या घोटाळ्यामुळे तब्बल 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. दागिने आणि हिऱ्यांच्या गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन देणारी कंपनी कोलमडली आहे. कंपनीने लोकांना आठवड्याला 6 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून कंपनी बंद केली. आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) हाती घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स ॲक्ट आणि बीएनएस (BNS) च्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
तीन जणांना अटक, सूत्रधाराचे पलायन-
माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर कथित सूत्रधार, युक्रेनियन नागरिक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या अटकेसाठी लुकआउट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आले आहेत.
कशी केली फसवणूक?
टॉरेस कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईत ऑपरेशन सुरू केले. त्यांनी दादरमध्ये फ्लॅगशिप शोरूम आणि नवी मुंबई, कल्याण, बोरिवली आणि मीरा रोड येथे शाखा उघडल्या. लोकांची फसवणूक करण्यासाठी कंपनीने एक आकर्षक गुंतवणूक योजना ऑफर केली. यामध्ये 6% चा साप्ताहिक परतावा आणि 52 आठवड्यांत गुंतवणुकीच्या मूल्याच्या तिप्पट रक्कम देण्याचे वचन दिले होते. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. त्याबाबत त्यांना अधिकृत पावत्याही देण्यात आल्या. प्रत्येक गुंतवणूकदारासाठी डिजिटल खाते आणि वेगळा ग्राहक आयडी तयार करण्यात आला.
यामध्ये परदेशी उपक्रमाला स्थानिक चेहरा देण्यासाठी, कोणतेही पूर्वीचे व्यावसायिक ओळखपत्र नसताना सर्वेश सुर्वेला संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. सर्व अधिकृत दस्तऐवजांसाठी सुर्वेच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात आला, तर जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को यांनी पडद्यामागून ऑपरेशन नियंत्रित केले. सुर्वेला या मोठ्या कटाची माहिती नव्हती, त्यामुळे त्याला सोयीस्कर बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: Torres Jewellery Scam: गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील हजारो लोकांची फसवणूक; गुंतवणूकदारांचा टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ)
कंपनीने लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही आठवडे नियमित परतावा दिला. मात्र वचन दिलेली 52-आठवड्यांची मुदत पूर्ण करण्यापूर्वी, टॉरेसने डिसेंबर 2024 मध्ये तांत्रिक समस्यांचे कारण देत पेमेंट थांबवले. नंतर 1 जानेवारी 2025 रोजी कंपनीने आपले शोरूम अचानक बंद केले. त्यानंतर गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
तक्रार दाखल-
आता 6 जानेवारी रोजी कंपनीच्या दादर कार्यालयाबाहेर संतप्त गुंतवणूकदार जमले होते. यावेळी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले. जारी केलेल्या ग्राहक आयडी क्रमांकांच्या आधारे 1.25 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक तपासाचा अंदाज आहे. एकूण फसवणूकीची रक्कम 1,000 कोटींपेक्षा जास्त असू शकते. शिवाजी पार्क, एपीएमसी (नवी मुंबई), आणि मीरा रोड येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुंतवणुकदारांच्या तक्रारी दाखल करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, अनेक एफआयआर फक्त दोन दिवसांत नोंदवले गेले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)