राजकीय विश्वात खळबळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी
CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2019) तोंडावर आल्या असताना राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नांदेडच्या एका तरुणाने अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. या प्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी याबाबत पुढील चौकशी सुरु केली आहे. राज्यात निवडणुकीमुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. चालू असलेल्या रणधुमाळीमध्ये अशा तणावाच्या गोष्टीची भर पडल्याने मुख्यमंत्र्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी मंत्रालयाच्या गृह विभाग कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे एक गोपनीय पत्र आले होते. या पत्रामध्ये 'मंत्रालयामध्ये घुसून मारू' असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संतोष कदम असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पत्रात आपला फोन नंबरही नमूद केला आहे. संतोष एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तोडाफोडीचे राजकारण करत विरोधी पक्षातील अनेक नेते आपल्या गळाला लावले. ईडी, सीबीआयची भीती दाखवून तसेच इतर आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणले. याबाबत कार्यकर्ते नाखूष आहेत. त्यामुळे भाजपाचा झेंडा हातात दिल्यास व ईडीची भीती दाखविल्यास मंत्रालयात घुसून ठार मारू अशा आशयाचे हे पत्र आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पंकज कुंभार गजाआड; सातारा पोलिसांची मुंबई येथे कारवाई)

तातडीने या पत्राची दखल घेत हे पत्र पुढील कारवाईसाठी पाठवल्यानंतर, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पत्र मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिले असल्याने त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान याधीही पंकज कुंभार या व्यातीने फेसबुकवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने 'अजित दादा काल वाचले. आता 4 फेब्रुवारीला सातारा येथे मुख्यमंत्र्यांसह 40 हजार लोकांचा खात्मा होणार', अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती.