पुण्यात आज संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा
पुणे पाऊस (Photo Credit : Twitter)

ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दोन वेळा झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपून काढले होते. पुण्यात (Pune) झालेल्या ढगफुटीमुळे 10 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता आज संध्याकाळीदेखील पुण्यात पावसाची शक्यता वर्वली गेली आहे. त्यामुळे पुणेकरांनो आज संध्याकाळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळा किंवा बाहेर असला तर लवकर घरी पोहोचा. पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात आजदेखील ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान (Meteorological Department) खात्याने शुक्रवारी दिला. 'साम'ने याबाबत वृत्त दिले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आकाश ढगाळ असणार आहे. दिवसा सूर्यप्रकाश असल्याने दुपारपर्यंत पावसाची शक्यता नाही. मात्र हवेत 80 टक्क्यांहून आधील आद्रता असल्याने संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कालदेखील पुण्यात कोथरूड, पाषाण या भागात पावसाच्या हलक्या सारी कोसळल्या होत्या.

(हेही वाचा: Heavy Rains In Pune: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत)

असा असेल पावसाचा अंदाज –

> शुक्रवार – ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस

> शनिवार – मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस

> रविवार – हलका पाऊस

दरम्यान, हवामान खात्याने यावर्षीचा मान्सूनचा (Monsoon) हंगाम संपल्याची घोषणा केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.