जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे
प्रशांत परिचारक (Photo Credit : Twitter)

सीमेवर लढणाऱ्या, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील भोसे येथे उमेदवाराच्या प्रचारसभेत, विरोधकांवर टीका करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत परिचारक यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते. या वक्त्यव्यामुळे प्रशांत यांच्यावर प्रचंड टीका झाली होती, त्यांना विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

‘पंजाबमधील जवान एकदाही घरी नाही. वर्षभर सीमेवर लढत असतो. त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसेच आहे,' असे आक्षेपार्ह वक्तव्य प्रशांत यांनी केले होते. परिचारक यांचे 2017 मध्ये दीड वर्षांचे निलंबन घालण्यात आले होते. पण, आता निवडणुकीच्या तोंडावर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. (हेही वाचा: पेढे घ्या पेढे! बिहारी लोक राहतात इकडं, पोरं होतात तिकडं; भाजप आमदाराचा वादग्रस्त वक्तव्यातून ‘धस’मुसळेपणा)

परिचारक यांच्या निलंबनाचा निर्णय मागे घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा सभापतींवर दबाव आहे, ही अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. देशातील सध्याचे वातावरण पाहता, परिचारक यांचे निलंबन मागे घेतले जाऊच कसे शकते? अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.