Thane: येत्या 6 महिन्यात ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार; शहर खड्डेमुक्त, कचरामुक्त, स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी CM Eknath Shinde यांच्याकडून 605 कोटींचा निधी
Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी, 3 डिसेंबर रोजी ठाणे महानगरपालिका (TMC) मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि टीएमसीचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी शिंदे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, ‘ठाणे शहराचा झपाट्याने विकास होत असून, या शहरातील बदल नागरिकांना दिसू लागले आहेत.’

ते म्हणाले, ‘ठाणे बदलत आहे, ठाण्यात विविध सेवा दिल्या जात आहेत, नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. ठाणे शहराचा विकास झपाट्याने होणार असून येत्या सहा महिन्यांत ठाणे शहर खड्डेमुक्त, कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर होईल, असा विश्वास वाटतो.’ एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘स्वच्छ व सुंदर रस्ते, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ स्वच्छतागृहे यांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. शहरातील सर्व रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा आमचा उद्देश आहे.’

‘ठाणे शहर भंगारमुक्त करण्यासाठी यांत्रिक साफसफाई केली जाणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यासाठी तसेच स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी सहा महिन्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.’ (हेही वाचा: मुंबई शहराची हवेची गुणवत्ता कमालीची घसरली, अनेक मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला परिणाम)

ते म्हणाले, ‘ठाणे शहर सुशोभीकरणाअंतर्गत, आम्ही प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण, विविध शिल्पांचे सुशोभीकरण, रस्त्याचे सुशोभीकरण, भित्तीचित्रे, डिव्हायडर आणि कर्ब स्टोन पेंटिंग, थर्माप्लास्टिक पेंटद्वारे लेन मार्किंग आणि झेब्रा क्रॉसिंग करणार आहोत. ही सर्व कामे उड्डाणपूल, पादचारी पूल, खाडी पूल इथे होतील. यासह सरकारी इमारतींचे रंगकाम आणि विद्युत रोषणाई, मियावाकी तंत्रज्ञान स्वच्छतेसोबतच शहराच्या सौंदर्यात भर घालेल.’

मोहिमेदरम्यान, 10.70 किमी रस्त्यांचे सिमेंटीकरण, 55.68 किमी रस्त्यांचे UTWT पद्धतीने काम आणि 75.44 किमी रस्त्यांचे डांबरीकरण पद्धतीने पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती देताना टीएमसी आयुक्त अभिजित बांगर म्हणाले, ‘ठाणे महानगरपालिका तसेच MMRDA आणि इतर संस्थांच्या वतीने अनेक प्रकल्प सुरू आहेत. ठाणे शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळू लागले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या वेळेत कशा सोडवता येतील यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘स्वच्छ व सुंदर शहरावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम केल्यास पुढील सहा महिन्यात ठाण्याचे चित्र नक्कीच बदलेल.’ दरम्यान, ठाणे शहराच्या विकासासाठी तब्बल 605 कोटींचा निधी दिल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.