ठाण्यातील रहिवाश्याला ऑनलाईन पद्धतीने रिचार्ज करणे पडले महागात, गमावले तब्बल 80 हजार रुपये
कारण या व्यक्तीच्या क्रेडिट कार्ड मधून तब्बल 80,623 रुपये डेबिट झाल्याने त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे (Thane) येथील खोपट येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करुन रिचार्ज करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण या व्यक्तीच्या क्रेडिट कार्ड मधून तब्बल 80,623 रुपये डेबिट झाल्याने त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देत असे म्हटले आहे की, जुलै 2 रोजी आरोपीने व्यक्तीला फोन करत तो कॉल सेंटर मधील कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच व्यक्तीला मोबाईलवर फोन करत आमच्याकडे रिचार्ज संबंधित ऑफर असल्याचे सांगितले.
रिचार्ज ऑफरचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीला कोणताही एक डेस्क रिमोट कंन्ट्रोल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितला. त्यानंतर व्यक्तीला 149 रुपयांचा रिचार्ज करण्यासाठी खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरण्यास सांगितले. या भामट्याच्या बोलण्याला भुलून व्यक्तीने कोणताही विचार न करता अॅप डाऊनलोड करण्यासह क्रेडिट कार्डचा वापर करुन रिचार्ज केला. परंतु अवघ्या काही वेळातच व्यक्तीच्या खात्यातून 80,623 रुपये काढले गेले.(नागपूर: क्षुल्लक कारणावरुन वारंवार शिवीगाळ करणाऱ्या ढाबा मालकाची हत्या; नोकरास अटक)
या प्रकरणी व्यक्तीने नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. फसवणूकदार हे अॅप वापरुन लोकांना फसवत आहेत. त्याचसोबत त्यांना बँकेचे अॅक्सेस करण्यासाठी एक रिमोट अॅक्सेस वापरुन लोकांची दिशाभुल करुन पैशांसंदर्भात फवसवेगिरी केली जात आहे.दरम्यान, बँकांकडून ग्राहकांना वारंवार सांगण्यात येते की, बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करु नये. तसेच खासगी माहिती सुद्धा एखाद्याला देणे धोक्याचे ठरु शकते. अशा पद्धतीचे प्रकार या पूर्वी सुद्धा उघडकीस आले आहेत.