ठाणेकरांनो! उद्या सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
Water Supply | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) शहरास पुरवत असलेला पाणीपुरवठा उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2020 या दिवशी 12 तासांसाठी बंद राहणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत इतक्या काळाता पाणीपुरवठा बंद असणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेच्या पिसे येथील अशुद्ध जलशुध्‍दीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणाऱ्या जलविहिनीजवळ पेट्रोलीयमची लाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरु आहे. दरम्यान, या खोदकामावेळी पाणी गळती सुरु झाली आहे. ही गळती थांबविण्यासाठी काही काम करणे गरजेचे असल्याने पाणीपुरवठा थांबविण्यात येत आहे.

सविस्तर माहिती अशी की, पिसे येथे ठाणे महापालिकेचे अशुद्ध जलशुध्‍दीकरण केंद्र आहे. या केंद्रास पाणीपुरवठा करणारी सुमारे 1200 मी.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी मुठवळ गावाजवळून जाते. दरम्यान, या गावाजवळ या जलवाहिनीनजीक पेट्रोलीयमची लाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरु होते. हे काम करत असताना मुख्य जलवाहिनीस हाणी पोहोचली. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती सुरु झाली आहे. पुढचा पाणीपुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने सुरु करायचा असेल तर, त्यासाठी ही गळती रोखणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच 12 तास पाणीपुरवठा बंद ठेऊन हे काम केले जाणार आहे. (हेही वाचा, पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत मुंबई ठरले देशात सर्वात सुरक्षित; दिल्लीतील पाणी अशुद्ध, जाणून घ्या संपूर्ण यादी)

दरम्यान, उद्या 12 तासांचा कालावधी वगळता इतर वेळी पाणीपुरवठा पुर्ववत सुरु होईल. परंतू, हा पाणीपुरवठा पुर्ववत झाला असला तरी पुढचे 1 ते 2 दिवस तो कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या आवश्यकतेनुसार पाणीसाठी करुन ठेवत आपली गैरसोय टाळावी. या कामात सहकार्य करावे असे अवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.