Congress Leader Sachin Sawant (PC - ANI)

गेल्या काही आठवड्यांपासून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत सीबीआय तपास करत आहे. आता सुशांतच्या शरिरात विषाचा अंश नाही असा अहवाल एम्सने दिला आहे. त्यानंतर कॉंग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपाने केलेले हीन पातळीवरचे राजकारण उघडे पडले आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचे भांडवल करुन महाराष्ट्र, मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची बदनामी करणाऱ्या भाजपाचे तोंड या अहवालामुळे काळे झाले असून, भाजपा आणि मोदी सरकारमधील या षडयंत्रामागचे मास्टर माईंड कोण आहेत, याचा तपास आता सीबीआयने करावा,’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येला वेगळे वळण देत त्याचा वापर महाराष्ट्राला बदनाम करणे, बिहारच्या निवडणुकीत वापर करणे आणि मोदी सरकारचे सर्व पातळीवरचे अपयश लपवण्यासाठी केलेला भाजपाचा आटापीटा उघड झाला आहे. अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक घसरण, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली बेरोजगारी, कोरोना हाताळण्यात मोदी सरकारला आलेले अपयश, या सर्वांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे षडयंत्र रचले होते त्याचा पर्दाफाश झालेला आहे.

या संपूर्ण प्रकरणात संघराज्य प्रणाली उद्धवस्त करण्यात आली, सीआरपीसीचे उल्लंघन करण्यात आले, मुंबई पोलीसांची यथेच्छ बदनामी केली गेली आणि याला भारतीय जनता पक्षाने खंबीर साथ दिली. सुशांतसिंह प्रकरणात ब्रँड अम्बेसिडर राहिलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्र्वर पांडे यांना महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल मोठे बक्षीस देण्यात आले. पांडेंची स्वेच्छानिवृत्ती तत्काळ मंजूर करून भाजपाचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलाने विधानसभा निवडणुकीची उमेदवारी बहाल केली. (हेही वाचा: दोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील)

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या भाजपाने यात देशातील तीन मोठ्या तपास यंत्रणांचा जोक बनवला आहे. या संस्थांचा केलेला हा अपमान देशासाठी अत्यंत घातक आहे. या यंत्रणावर झालेला खर्च हा जनतेच्या पैशातूनच येतो, त्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली. मोदी सरकार पुरस्कृत 'गोदी मीडिया ट्रायल' झाली. विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या महाराष्ट्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे अत्यंत हीन पातळीवरचे राजकारण भाजपाने केले असून महाराष्ट्राची जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, असेही सावंत म्हणाले.