Sushant Singh Rajput Case: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राजकीय भाष्य करणं योग्य नाही - संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: Twitter)

Sushant Singh Rajput Case: सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. त्यामुळे या निर्णयावर राजकीय भाष्य करणं योग्य नाही. आमच्या राज्यातील न्यायव्यवस्था ही देशात सर्वात चांगली न्यायव्यवस्था राहिली आहे. येथे कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Case) तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. (हेही वाचा - पार्थ पवार म्हणतात 'सत्यमेव जयते', सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सूचक ट्विट)

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे एक षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांनी तपास अत्यंत प्रामाणिकपणे केल्याची माझी माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. मुंबई पोलिसांना आपल्याच राज्याचे नेते बदनाम करत आहेत, असे राऊत यांनी म्हटलं आहे.

याशिवाय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने राज्यात हाताळले गेले त्यावरून महाराष्ट्र सरकारने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. न्यायव्यस्थेवर विश्वास वाढवणारा हा निर्णय असल्याचंदेखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.