'एकनाथ शिंदे गटात अडकलेले काही लोक आमच्याशी संपर्क साधत आहेत': Aaditya Thackeray
Aaditya Thackeray | (Photo Credits: Twitter)

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील काही लोक आता आपल्याशी संपर्क साधत असल्याचा दावा महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बुधवारी केला. ‘एकनाथ शिंदे गोटात अडकलेले काही लोक आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमच्याशी संपर्क साधत आहेत. आमच्याकडे परत येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी आमची दारे खुली आहेत. ज्यांना तिथे राहायचे आहे, त्यांनी राजीनामा द्या आणि निवडणुकीत आम्हाला सामोरे या’, असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार हल्ला चढवताना, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी म्हटले की, ‘खरा मुख्यमंत्री कोण आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे’. नवीन सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाकडे त्यांचा इशारा होता. मंत्रिमंडळ विस्ताराचा समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्रिमंडळाने ना मुंबईचा आवाज ऐकला, ना महिला, ना अपक्ष आमदारांचा आवाज ऐकला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि त्यांच्या सरकारला पाठिंबा देणार्‍या बंडखोर शिवसेना कॅम्प आणि भारतीय जनता पक्ष यांच्या प्रत्येकी नऊ आमदारांचा या मंडळात समावेश केला. मंत्रिमंडळात एकही महिला आमदार किंवा अपक्ष समाविष्ट करण्यात आलेला नाही.

अधिवेशनापूर्वी ठाकरे म्हणाले की, हे एक असंवैधानिक शासन आहे. सुरुवातीपासूनच ते बेकायदेशीर आहे, ज्यात बेईमान देशद्रोही आहेत. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एका कॅन्टीन मॅनेजरला चपराक मारल्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, हे भ्याडांचे कृत्य असून राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. (हेही वाचा: वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत एसटी प्रवास; सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ; CM Eknath Shinde यांची मोठी घोषणा)

शिंदे यांनी जूनमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात बंड केल्यावर त्यांच्याशी आघाडी केलेल्या पहिल्या 14 ते 15 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. आदित्य ठाकरे हे जूनच्या बंडापासून सातत्याने बंडखोरांवर हल्ला करत आहेत, त्यांना 'गद्दर' (देशद्रोही) म्हणून संबोधत आहेत. शिवसेनेतील याच बंडखोरीमुळे जूनअखेर तीन पक्षांचे महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार कोसळले होते.