Nashik: नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करणे जीवावर बेतले; 6 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू
Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृतांच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होऊ लागली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात असताना नाशिकमध्ये (Nashik) एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्याच्या वालदेवी धरण (Waldevi Dam) परिसरात मैत्रीणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 9 जणांपैकी 6 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे. पाण्यात उभे राहून फोटो काढताना पाय घसरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी गमे (वय, 12), आरती भालेराव (वय, 22), हिम्मत चौधरी (वय, 16), नाजिया मनियार (वय, 19), खुशी मणियार (वय, 10), ज्योती गमे (वय, 16) अशी मृतांची नावे आहेत. तर, समाधान वाकळे, प्रदीप जाधव, सना मणियार सोनी हे तिघेजण या घटनेत थोडक्यात बचावले आहेत. सोनी हीचा काल (16 एप्रिल) वाढदिवस होता. दरम्यान, तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्वजण वालदेवी धरण परिसरात गेले होते. यावेळी केक कापल्यानंतर हे सर्वजण पाण्यात उभे राहून सेल्फी काढत होते. मात्र, दुर्देवाने या मुलांपैकी एकजण पाण्यात घसरून पडल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी इतरांनी देखील पाण्यात उड्या टाकल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Pune Suicide: बेड मिळत नसल्याने कोरोनाबाधित महिलेची गळफास लावून आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

या घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शोध घेतल्यानंतर केवळ आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. परंतु, अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळीपासून पुन्हा शोधकार्य सुरु झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत राहिलेल्या 5 जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर या सर्वांचे मृतदेह नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन आहे. ज्यामुळे राज्यात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु आहे. लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये सर्वत्र हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. यामुळे या सर्व मित्र-मैत्रीणींनी वालदेवी धरण परिसरात वाढ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुर्देवाने यापैकी 6 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.