धक्कादायक! दारूच्या व्यसनाला वैतागून थोरल्या भावाकडून धाकट्या भावाची हत्या; नागपूर येथील घटना
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

दारुच्या व्यसनाला वैतागून थोरल्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवरी परिसरात शुक्रवारी घडली. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून स्थानिक पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताला दारूचे व्यसन होते. दारु पिऊन घरी आल्यानंतर तो कुटंबियांना शिवीगाळ करायचा. याच कारणांवरून शुक्रवारी दोन्ही भावात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या डोक्यात लाकडी काठीने वार केला. त्यात धाकट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

किशोर अखंड (वय, 38) मृताचे तर, सुधाकर अखंड (वय, 42) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सख्ये भाव असून, ते गोवरी ता. कळमेश्वर येथे एकाच घरात राहतात. किशोरला दारूचे व्यसन होते. तसेच दारू पिल्यानंतर तो कुटुंबियांना शिवीगाळ करायचा. यामुळे किशोर आणि सुधाकर यांच्यात अनेकवेळा बाचाबाची झाली आहे. कुटुंबियांनी अनेकदा किशोरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वागण्यात काहीच सुधारणा झाली नाही. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा दारु पिऊन आल्यानंतर किशोरने कुटुंबियांना नेहमीप्रमाणे शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुधाकरने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यातून वाद विकोपास गेला आणि सुधाकरने रागाच्या भरात किशोरला काठीने मारहाण केली. यात किशोरला जबर दुखापत झाल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी किशोरला मृत घोषीत केले आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! नवी मुंबईमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी सुधाकरला ताब्यात घेतले आहे. सुधाकरने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली असून हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्याला शुक्रवारी कळमेश्वर येथील न्यायालयात हजरे केल्यांनतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.