आजच्या 'सामना' मुखपत्रात पंतप्रधान मोदींवर टीका; 'शेठ, हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडाल' अशा शब्दात देण्यात आला इशारा
File image of PM Narendra Modi with Sharad Pawar (Photo Credits: PTI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी दिलेल्या ऑफरबद्दल आणि सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला. पवारांनी जरी मोदींची ही ऑफर स्वीकारली नसली तरी याला सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे आजच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून. आजच्या सामना मधून  ‘शेठ, हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडाल’ असा इशाराच शिवसेनेने जणू भाजप ला दिला आहे.

इतकंच नव्हे तर सामनातील अग्रलेखात आज अमित शाह यांना देखील एक थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. "जर पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ही शंका अमित शाह वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा नरेंद्र मोदी यांना अपेक्षित होता?" असा सवाल करण्यात आला आहे.

"महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल" अशा काड्या शब्दात मोदींना अप्रत्यक्ष इशारा दिला गेला आहे.

नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची दिली होती ऑफर; शरद पवार यांच्या खुलास्यावर पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

दरम्यान, भाजपतील काही बडे नेते देखील पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ खडसे यांनी तर पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना निवडणुकीत पडलं असल्याचा आरोप भाजपातील काही नेत्यांवर केला आहे.