Shiv Sena (UBT)-MNS Alliance: महाराष्ट्र काँग्रेसचा शिवसेना (युबीटी) आणि मनसे युतीला पाठिंबा; राज्याच्या हितासाठी आणि 'जातीय' भाजपला दूर ठेवण्यासाठी घेतला निर्णय

शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून तीव्र झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच घडेल. मी आता कोणतेही संकेत देणार नाही, पण लवकरच स्पष्ट बातमी देईन.’

Shiv Sena (UBT)-MNS Alliance: महाराष्ट्र काँग्रेसचा शिवसेना (युबीटी) आणि मनसे युतीला पाठिंबा; राज्याच्या हितासाठी आणि 'जातीय' भाजपला दूर ठेवण्यासाठी घेतला निर्णय
उद्धव ठाकरे व राज ठाकरे

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात नव्या घडामोडी घडत असताना, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यातील संभाव्य युतीला पाठिंबा दर्शवला आहे. ही युती भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आणि राज्याच्या सांस्कृतिक व सामाजिक हितांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, असे लोंढे यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या चुलत बंधूंमधील संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना आता नवे बळ मिळाले आहे, आणि यामुळे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून तीव्र झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच घडेल. मी आता कोणतेही संकेत देणार नाही, पण लवकरच स्पष्ट बातमी देईन.’ दुसरीकडे, राज ठाकरे यांनीही मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे कठीण नसल्याचे म्हटले आहे. अतुल लोंढे यांनी या संदर्भात सांगितले की, जर ही युती महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भाजपच्या सामाजिक व सांस्कृतिक विघटनकारी धोरणांना रोखण्यासाठी होत असेल, तर काँग्रेस त्याचे स्वागत करेल.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी ही युती महत्त्वाची ठरेल, असे लोंढे यांनी नमूद केले. महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने 235 जागांसह प्रचंड विजय मिळवला, तर महा विकास आघाडी (एमव्हीए) ला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसला 16, शिवसेना (UBT) ला 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला 10 जागा मिळाल्या. (हेही वाचा: Shiv Sena (UBT) And MNS Alliance: सेना मनसे एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत; उद्धव ठाकरे आपल्या शैलीतच बोलले)

या पार्श्वभूमीवर, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यातील युतीचा विचार होत आहे. काँग्रेसला या युतीमुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांमध्ये आपली ताकद वाढवण्याची संधी मिळू शकते. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी युतीच्या चर्चांबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, युतीसाठी ठोस प्रस्ताव असणे आवश्यक आहे, कारण 2014 आणि 2017 मध्ये अशा चर्चा अपयशी ठरल्या होत्या.

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2025 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).