महाराष्ट्रात युतीला नव्या मावळ्यांची गरज तेथे स्वागत होईल, उडणारे कावळे नकोत; 'सामना' च्या अग्रलेखातून शरद पवार यांच्यावर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (संग्रहित छायाचित्र) (Photo credits: shrad_pawar/facebook)

महाराष्ट्रासह देशभरात सध्या भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार 'इन्कमिंग' सुरू आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे अनेक दिग्गज नेते भाजपा- शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून आगामी विधानसभा निवडणूकीसाठी तयारीला लागले आहेत. यावरूनच काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) 'उडून गेले ते कावळे' अशा शब्दांत दलबदलूंना टोला लगावला होता. यावर आज उत्तर देताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' च्या अग्रलेखात (Saamana Editorial) शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रात जिथे शिवसेना - भाजपा युतीला नव्या मावळ्यांची गरज आहे तिथे त्यांचे स्वागत होईल. उडून जाणारे कावळे आम्हाला नकोत असे सामनाच्या अग्रलेखात आज ठासून सांगण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या टीका करताना सामना मध्ये 2014 सालच्या विधानसभा निवडणूकीचादेखील दाखला देण्यात आला आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले होते. हा चोंबडेपणा करण्याची त्यांना गरज नव्हती. शरद पवारांनी 2014 मध्ये जे केले, त्याचेच परिणाम आता राष्ट्रवादी पक्ष भोगतोय असेदेखील सामन्याच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

राजकारणामधील शरद पवार यांची भीती आता संपली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा बांधण्यासाठी शरद पवार शिवसेनेची भाषा वापरत आहेत. 'राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळेस फालतू काव काव केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते. 'केला तुका आणि झाला माका' अशी आज राष्ट्रवादीची स्थिती झाली आहे,' असं म्हणत शिवसेनेने राष्ट्रवादी सह शरद पवारांवर सामना मधून

शाब्दिक हल्ला केला आहे.