महाराष्ट्राची भाग्यरेषा भगवी आहे; 'सामना' मधून शिवसेनेचा भाजपाला राज्यात सत्ता स्थापनेच्या दाव्यावरून पुन्हा इशारा
Shivsena, BJP (Photo credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेवरून सुरू असलेलं राजकीय नाट्य आता महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपलं आहे. शिवसेना - महायुतीला जनेतेने कौल दिल्याने आता त्यांनीच सरकार स्थापन करावं असं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवारांनी काल पत्रकार परिषदेमध्ये काल जाहीर केले आहे. आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून पुन्हा भाजपावर आरोप करण्यात आले आहेत. राज्यात महायुतीचं सरकार येईल असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोंडात साखर पडू दे . मात्र, प्रश्न असा आहे की, सरकार नक्की कधी येणार व महायुती ती कोणाची आणि कशी हे सांगितलं नाही असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

राज्यात सत्तेच्या संघर्षामध्ये घोडाबाजार सुरू आहे. शिवसेनेच्या आमदारांशी फोन वरून बोलून 'पैशांची' भाषा करत असल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या, हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी संबंध नसलेले अनेक लोक देखील संपर्क करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच राजकीय झुंडशाही राज्याच्या इतिहासाला शोभणारी नसल्याचं म्हणतं शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री पदी शिवसेनेचाच आमदार असेल ही ओळ अधोरेखित केली आहे.

गुंडांचा धाक आणि पैशांच्या जोरावर कोणी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना तलवार घेऊन उभी आहे असा इशाराही आज सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला आहे. या मतदान निकालामध्ये जनतेने शिवसेनेच्या बाजूने 56 तर भाजपाला 105 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र महायुती एकत्र निवडणूकींना सामोरी गेली असली तरीही अद्याप सरकार स्थापन करू शकलेली नाही. सत्तेमध्ये समान वाट्यासाठी शिवसेना आक्रमक आहे. 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने आता सत्ता स्थापनेसाठी काही तासांचा अवधी उरला आहे. यापार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता आहे.