राम मंदिर (Ram Mandir) उभारणी आंदोलनास विश्व हिंदू परिषदेने दिलेली स्थगिती, त्यानंतर आरएसएस (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मंदिर उभारणीस सुरुवात करणार असल्याची केलेली घोषणा यांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav) यांन जोरदार टीका केली आहे. 'अयोध्येतील राममंदिराबाबत मोदींचे सरकार टोलवाटोलवी करीत आहे. आता विश्व हिंदू परिषद (VHP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मंदिराच्या बाबतीत अंगचोरक्या सुरू केल्या आहेत', असे सांगतानाच 'राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे', असा घणाघातही उद्धव यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र दै. सामनामध्ये ' मंदिर पुन्हा कुलूपबंद!' या मथळ्याखाली एक लेख लिहीला आहे. या लेखात त्यांनी मोदी सरकार, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात कोणाचेही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर ‘संघ’ राममंदिर उभारणीस सुरुवात करेल असे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने नेमकी हीच भूमिका मांडली. याचा अर्थ असा की, राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे. 2019 च्या निवडणुकीत राममंदिर हा अडचणीचा मुद्दा मोदी परिवारासाठी ठरू नये. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय? राममंदिर हा राजकीय मुद्दा बनू नये व मोदी परिवारास यावर लोकांसमोर जाताना अडचणी निर्माण होऊ नयेत असे आता एकंदरीत दिसते. निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. (हेही वाचा, लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिर बांधकामास सुरुवात: मोहन भागवत)
सामनातील लेखात उद्धव ठाकरे म्हणतात, राममंदिराचे राजकारण निवडणुकीत नको म्हणून निवडणुकीनंतर पाहू असे संघ परिवाराचे म्हणणे आहे, पण पंचवीस-तीस वर्षे मंदिर प्रश्नाचा वापर निवडणूक मुद्दा म्हणूनच झाला म्हणून ‘आपण’ सगळे इथपर्यंत पोहोचलो. आपण शिखरावर विराजमान झालो आहोत ते राममंदिराचे राजकारण केल्यामुळेच. त्यामुळे आता राजकारण नको हा नवीन जुमला काय आहे? 2019 च्या निवडणुकांत बहुमत मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नितीश कुमार, रामविलास पासवान यांची राममंदिराबाबतची भूमिका नेमकी काय? त्यांना राममंदिर हवे की नको? हे आताच समजून घेतले पाहिजे.
विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिराचा विषय टाळावा ही त्यांची मजबुरी असेल किंवा अंतर्गत बाब. शेवटी सोयीसाठी चुली वेगळय़ा असल्या तरी एकमेकांशी ठरवूनच त्यांचे विषय मागे किंवा पुढे केले जातात. कोलकात्यात अमित शहांची रथयात्रा रोखली म्हणून तेथे हिंदुत्वाचा हुंकार दिला जातो, पण अयोध्येतील राममंदिराचा विषय मात्र कुलूपबंद केला जातोय. शेवटी हिंदुत्वापासून प्रभू श्रीरामापर्यंत सगळेच कट सोय म्हणून केले जातात. निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयूत ज्यांनी रक्त, बलिदान दिले त्यांच्या बलिदानास नाकारण्यासारखे आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.